अखेर नरेंद्र पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी  

393

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा आज (मंगळवार) राजीनामा दिला. यामुळे  पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.   विद्यमान विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचा  भाजप प्रवेश घडवून आणण्यात नरेंद्र पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाटील  डावखरेंना सोडण्यासाठी भाजप मुख्यालयात गेले होते. मात्र, डावखरे आपले चांगले मित्र असल्यामुळे आपण आल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, भाजपकडून महामंडळ नियुक्त्या करताना नरेंद्र पाटील यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर नरेंद्र पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जास्तच बळ मिळाले होते. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत. ते विधानसभा सदस्यांमधून निवडून आलेले होते.