पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार; खासदार उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश  

148

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – अखेर  राष्ट्रवादीचे खासदार  उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत  आज (शनिवारी)  आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.  तत्पूर्वी उद्यनराजे यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.  उद्यनराजे यांच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.

नवी दिल्लीत उद्यनराजे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा,  कार्यकारी अध्यक्ष जे. पी.नड्डा,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत  भाजपमध्ये प्रवेश केला.

पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजप पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल . २०१४ मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती. २०१९ मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठे यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशाने सर्व खुष आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे नाव ज्यांनी मोठे केले, असे उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे.  काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही उदयनराजेंनी मोदींची साथ दिली होती.  उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करत असल्याने युवकांचे त्यांच्यावर मोठे प्रेम आहे. त्यांच्या येण्याने  भाजपची ताकद वाढली आहे.

यावेळी  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  म्हणाले की,  उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तसेच ते साताऱ्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ते अन्य पक्षाशी जोडलेले असले, तरी भाजपशी चांगले संबंध ठेवून होते.