अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; वाराणसीकडे लक्ष

117

वाराणसी, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे.   उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे  पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे. याशिवाय, शत्रुघ्न सिन्हा यांचा पाटणा साहिब, सनी देओल यांचा गुरदासपूर हे मतदार संघ देखील महत्त्वाचे मानले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यातील मतदानासोबतच पणजी आणि तमिळनाडूतील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीच्या सहा टप्प्यांमध्ये सरासरी ६६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. त्यांचे भवितव्य १० कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने १ लाख १२ हजार मतदान केंद्रे उभारली आहेत.