अकोल्यातील ‘आप’चे नेते मुकीम अहमद यांचा मृतदेह आढळला

116

बुलडाणा, दि. ४ (पीसीबी) –  गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले  अकोल्यातील ‘आप’चे नेते मुकीम अहमद यांचा बुलडाण्यातील मेहकर तालुक्यात जानेफळ शिवारात मृतदेह आढळून आला . त्याचबरोबर अहमद यांच्यासोबत बेपत्ता असलेले त्यांचे मित्र शफी कादरी यांचाही मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अहमद गेल्या ३० जुलैपासून बेपत्ता होते. अहमद यांची गाडी ३० जुलैला अकोल्यातील वाशिम बायपास चौक भागात बेवारस आढळून आली होती. मुकीम अहमद आपचे नेते होते. याशिवाय ते माहिती अधिकार कार्यकर्ते होते. अकोला जिल्हा परिषद उर्दू शिक्षक भरतीतील घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. याशिवाय अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुथ्थूकृष्णन शंकरनारायण यांचे कर्णबधिरात्वाचे प्रमाणपत्र काढत यात होणारा भ्रष्टाचार समोर आणला होता.

अहमद बेपत्ता झाल्यानंतर अकोला पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. मात्र, अहमद यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  पोलीस कसून  तपास करत आहेत. दरम्यान, अहमद एकेकाळी समाजवादी पक्षाच्या युवक आघाडी असलेल्या युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी बसप, भारिप  पक्षात प्रवेश केला होता. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांच्या ‘लोकमंच’ पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.