अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून

532

मुंबई, दि. २ (पीसीबी) – अंबरनाथमधील बुवापाडा डोंगर परिसरात सात वर्षांच्या मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आली.

शिवम दिग्विजय रजक (वय ७, रा. बुवापाडा, अंबरनाथ, मुंबई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रजक कुटूंबीयांनी बुधवारी (दि.१) रात्री तो बेपत्ता असल्याची तक्रार अंबरनाथ पोलिस ठाण्यात केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुवापाडा भागात राहणारा शिवम बुधवारी रात्री घरातील सामान आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर अंबरनाथ पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. आज (गुरूवार) सकाळी बुवापाड्याच्या खदानशेजारील डोंगराळ भागात तबेला मालकाला शिवमचा मृतदेह आढळला. पोलिसांनी संशयाच्या आधारे रजक कुटुंबियाच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अर्जुन हा उत्तरप्रदेशातील जौनपुरचा रहिवासी असून तो अंबरनाथमध्ये सुतारकाम करत होता. त्याने रजक यांच्या घरी खानावळ लावली होती. त्यामुळे त्याची घरी येजा होती. अर्जुनने शिवमच्या वडिलांना काही पैसे दिले होते, त्यातील मोठी रक्कम शिवमच्या वडिलांनी परत दिली होती. मात्र उर्वरित रकमेसाठी तगादा लावणाऱ्या अर्जुनने अनेकदा दारू पिऊन शिवमच्या घरी जाऊन भांडण केले होते. याच रागातून त्याने हा खून केल्याचा प्राथमिक संशय  पोलिसांना आहे. अंबरनाथ पोलिस तपास करत आहेत.