अंधेरीत पोलिसांच्या खबऱ्याची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या

921

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुंबई  पोलिसांसाठी खबऱ्याचे काम करणाऱ्या एका तरुणाची धारदार शस्त्राने डोक्यावर, छातीवर आणि गुप्तांगावर वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका गाळ्यातून उघडकीस आली.

अविनाश बाली  (वय ३८) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, अविनाश हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलिसांसाठी खबऱ्याचे काम करत होता. आंबोली परिसरात किनान आणि रूबेन या २ युवकांच्या हत्येसंदर्भात तो मुख्य साक्षीदार होता. अंधेरी एमआयडीसी परिसरात एका गाळ्यात अविनाशची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले. ज्या गाळ्यात अविनाश बालीचा मृतदेह आढळून आला, त्या गाळ्याचा मालक आणि त्याचे काही नोकर सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे. फरार आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. काही वर्षांपूर्वी त्याला अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात अटक करण्यात आली होती. फरार आरोपींना ही अटक अविनाशच्या खबरीवरुन झाल्याचा संशय होता. यावरुन बऱ्याच वेळा वादही झाला असल्याचे मृताच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. याच कारणास्तव त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी प्रथम दर्शनी तपासात व्यक्त केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या काही टीम राज्याबाहेर पाठविण्यात आले आहेत.