अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी प्रसिध्द होणार

157

– महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची जोरदार तयारी

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – महापालिका निवडणुका या जून-जुलै मध्येच होणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाचे अधिकार घेतल्यामुळे १० मार्च रोजी ज्या स्थितीत कामकाज निवडणूक प्रक्रियेचे काम थांबले होते तेथून पुढे पुन्हा सर्व सुरू झाले आहे. प्रभाग रचनेच्या हरकती-सुचना आणि सुनावणी पूर्ण झाली होती, मात्र अंतिम प्रसिध्दी बाकी होती. आता १७ मे रोजी सर्व प्रभागांचा अंतिम रचना राज पत्रात प्रसिध्द कऱण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक सर्व महापालिकांना पाठविले आहे. त्यामुळे आजवर जे तीन सदस्यांचे प्रभाग केले तेच कायम राहणार आहेत. नव्याने प्रभाग रचना होणार, प्रभाग आता दोन सदस्यांचा होणार अशा ज्या काही चर्चा होत्या त्यांना पूर्णविराम मिळाला आहे. प्रभाग रचनेमध्ये विशेष कुठलेही फेरबदल संभवत नाहीत. त्याशिवाय ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, हा महाआघाडी सरकारचा निश्चयसुध्दा निकालात निघाला आहे. आता होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राबाबत ४ मे रोजी जसे आदेश दिले होते अगदी तसेच आज मध्ये प्रदेश सरकारबद्दल दिले आणि ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास सांगितले आहे. दोन्ही राज्य सरकारला जे आदेश दिलेत ते पाहता निवडणुका लवकरच म्हणजे जून किंवा जुलै मध्येच होणार हे आता स्पष्ट आहे.

पावसाळ्यामुळे निवडणुका घेण्यास अडचण असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत त्यात प्रशासक नियुक्तीपासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक झाली पाहिजे, असा दंडक घालून दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर १२ मार्च रोजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सहा महिन्यांत म्हणजेच १२ सप्टेंबर पूर्वीच निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. ३१ ऑगस्ट मध्ये गणेशोत्सव असल्याने तसेच ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस असतो म्हणून तत्पूर्वीच जून-जुलैमध्ये निवडणूक घेणे सोयिचे असणार आहे. २० जून पासून राज्यातील संतांचे पालखी सोहळे पंढरपूर वारिसाठी निघतात. तब्बल १०-१२ लाख वारकरी वारीत असल्याने जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरवातीला म्हणजे १५ जुलै पूर्वी निवडणूक घेणे सोयिचे होणार नाही. अशा परिस्थितीत जून च्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात अथवा जुलै अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे.