अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची ३५ वर्षांपूर्वीच्या खून खटल्यातून निर्दोष सुटका

104

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची ३५ वर्षांपूर्वीच्या खून खटल्यातून निर्दोष सुटका झाली आहे. फेब्रुवारी १९८३ मधील तस्कर जॉन परेरा हत्याप्रकरणातून छोटा राजनला न्यायालयाने दोषमुक्त केले असून सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने त्याची  सुटका केली.

फेब्रुवारी १९८३ मध्ये छोटा राजनने मुंबईतील तस्कर जॉन परेराची हत्या केल्याचा आरोप होता. मासेमारीच्या व्यवसायातून तस्करीकडे वळलेल्या जॉन परेराची छोटा राजन आणि त्याच्या साथीदाराने हत्या केली होती. छोटा राजन त्यावेळी २२ वर्षांचा होता. परेरा २१ फेब्रुवारी १९८३ रोजी सकाळी मुलगी हेलन आणि दोन वर्षाच्या मुलासोबत जुहूतील समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकला गेले असताना छोटा राजनने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात छोटा राजनला त्यावेळी अटकही झाली. काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर छोटा राजनला जामीन मंजूर झाला होता. यानंतर छोटा राजन पसार झाल्याने तो पुन्हा न्यायालयात हजर झाला नव्हता. या खटल्यातील सात आरोपींची न्यायालयाने १९९६ मध्येच सुटका केली होती.