अँटिग्वाच्या नागरिकत्वासाठी २८ भारतीयांचे अर्ज

230

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेल्या मेहुल चोक्सीला अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता २८ भारतीय नागरिकांनी या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केल्याचे उघड झाले आहे. 

वर्षभरात तब्बल २८ भारतीयांनी अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केल्याने अँटिग्वामध्ये राजकीय भूकंप आला आहे. अँटिग्वामधील विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. अँटिग्वा आणि बारबुडा देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी लोकांची गर्दी का होत आहे. यावर पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली आहे.

२०१४ ते आतापर्यंत २८ भारतीयांनी अँटिग्वाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. १ जानेवारी ते ३० जून २०१७ दरम्यान अर्ज करणाऱ्यांपैकी ७ जणांना अँटिग्वाचे नागरिकत्व मिळाले आहे. या सर्व लोकांनी कॅरिबियन देशात २ लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे.  अँटिग्वामध्ये कोणत्याही परदेशी नागरिकाला दुहेरी नागरिकत्व बहाल करण्यात येते. नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांना राष्ट्रीय विकास फंड (एनडीएफ) मध्ये सरकारद्वारा मंजूर केलेल्या रियल इस्टेट किंवा सरकारकडून मंजुरी मिळालेल्या व्यापारात गुंतवणूक करावी लागते.

अँटिग्वाचा पासपोर्ट मिळाल्यास त्या व्यक्तीला १३२ देशांत व्हिसाविना प्रवास करण्यास मुभा मिळते. तसेच त्याच्यावर काही आरोप असल्यास त्याचे प्रत्यार्पण केले जात नाही. म्हणून या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी लोकांची गर्दी असते. ७ भारतीयांना अँटिग्वाचे नागरिकत्व दिल्याची माहिती समोर आली असली तरी उर्वरित लोकांची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.