Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


आपुली प्रतिमा होते आपुलीच वैरी !


Main News <

"आपुली प्रतिमा कधी आपुलीच वैरी होईल" हे भावगीत खूप काही सांगून जाते. असेच काहीसे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचे आणि येथील राज्यकर्त्यांचे झाले आहे. पिंपरी महापालिका ११ ऑक्टोबर रोजी ३३ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. नगरपालिकेपासून ते महानगरपालिकेपर्यंतच्या वाटचालीत कारभारातील अनेक स्थित्यंतरे शहरवासियांनी अनुभवली. आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेपासून ते कर्जबाजारीपर्यंतचाही अनुभव येथील करदात्यांनी घेतला आहे. या महापालिकेला स्थापनेपासून अनेक प्रशासक लाभले. प्रत्येकाने आपआपल्या परीने शहराचा सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या शहरविकासाला ग्रहण लागल्याचे पहायला मिळत आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरु असलेला एककल्ली कारभार, विरोधी पक्ष असूनही काँग्रेसचे राष्ट्रवादीशी हातमिळावू धोरण, शिवसेनेचा अप्पलपोटी कारभार, भाजप, मनसेची तोकडी पडणारी ताकद त्यातच महापालिकेला लाभलेले आयुक्त राजीव जाधव यांचे कचखाऊ धोरण यामुळे महापालिकेच्या कारभाराची मागील दीड वर्षात पुरती दैना झाली आहे. दीड वर्षात महापालिका विकासकार्याच्या बाबतीत थोडी थोडकी नव्हे तर पाच वर्षांनी मागे गेली आहे. 

महापालिकेसमोर अनेक आव्हाने आहेत. जकात गेली, त्यापाठोपाठ एलबीटीनेही काढता पाय घेतला आहे. शहराची औद्योगिकनगरी ही ओळख तर कधीच मागे पडली. अश्या परिस्थितीत उत्पन्नाचे साधन काय, शहरात विकास प्रकल्प राबविणार कसे हा प्रश्न आ वासून उभा आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले. शहरातील झोपड्यांमधील रहिवासी नरकयातना भोगत आहेत. समाविष्ट गावे विकासापासून कोसो दूर आहेत. शहरातील सर्व भागात समान करप्रणाली असताना शहरातील काही भाग इतके विकसित झाले की तिथे विकास कामांची संधी नसल्याने रस्त्यांवर नाहक डांबराचे थर चढवावे लागतात. तर काही भाग इतके विकसित आहेत की हा भाग महापालिका हद्दीत येतो का, अशी शंका येते. मागील ३२ वर्षात शहराचा समान विकास होऊ शकला नाही, हे खूप मोठे दुर्देव म्हणावे लागेल. 

अनधिकृत बांधकाम प्रश्नामुळे शहर पुरते बदनाम झाले. हजारो घरे जमिनदोस्त करावी लागली. अजूनही अश्या हजारो बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. हे पातक कोणाचे ? रेडझोन, वाढीव बांधकामे, प्राधिकरणबाधितांना जमीन परतावा, आरक्षण बाधितांना त्यांचा मोबदला हे प्रश्न अजूनही रेंगाळले आहेत. शहराचा 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात समावेश होऊ शकला नाही. त्याला राजकीय रंग दिला जात असला तरी यामागील काळातील राजकीय नेते व महापालिका प्रशासनाच्या चुका शहरवासियांना नाहक भोगाव्या लागत आहेत. देशातील अनेक शहरे 'मेट्रो सिटी' होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये 'बीआरटीएस'सारखे अनावश्यक प्रकल्प राबवून कोट्यावधी खड्ड्यात घातले जातात. आरक्षणातील रस्ते विकसित करण्यास मर्यादा येत असताना मेट्रो, रिंगरोडसारख्या वाहतूक प्रकल्पांना रस्त्याखालून बोगदे काढण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. जेएनएनयुआरएम प्रकल्प नव्या केंद्र सरकारने गुंडाळला तरी या योजनेअंतर्गत शहरात सुरु केलेली विकास प्रकल्प पूर्ण होण्यास किती वर्षे लोटतील, याचा अंदाज येथील राज्यकर्त्यांनाही नाही. अर्थातच ही कामे पूर्ण करायला महापालिकेला वाढीव खर्चासह 'पदरमोड' करावी लागणार आहे. 

दर आठवड्याला महापालिका प्रशासनातील खाबुगिरीची प्रकरणे बाहेर येतात. काही राजकीय नेत्यांना केवळ खुर्च्या उबविण्यात रस आहे. निवडणुकीसाठी पाच वर्षे रसद गोळा करायची, त्यातून निवडणूक लढवायची एवढ्याच 'उदात्त' हेतूने काहीजण कार्यरत आहेत. महापालिका प्रशासनाला शिस्त राहिलेली नाही. आम्ही मारतो, तुम्ही रडल्यासारखे करा, असा तोंडदेखले कारभार लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये सुरु आहे. अर्थात काही लोकप्रतिनिधी व अधिकारी शहर विकासासाठी, खाबुगिरीच्या वाटा बंद करण्यासाठी झटतात. मात्र, त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. शहरात विकास कामे सुरु नाहीत, असे नाही. मात्र, त्याचा दर्जा राखला जात नाही, ती वेळेत पूर्ण होत नाहीत. ठेकेदारांचे नको तितके लाड महापालिका पुरविते. त्याचा परिणाम विकास कामांवर होत असून वाढीव खर्चामुळे महापालिकेच्या तिजोरीवर भार येत आहे. आयुक्त राजीव जाधव हे तर उत्तम प्रशासकाचा ठसा उमटविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. चुकीच्या, भ्रष्ट आणि अप्पलपोटी कारभारामुळे दिवसें-दिवस महापालिकेची प्रतिमा मलिन होत चालली आहे. डोळे मिटून दुध पिणाऱ्या मांजराच्या भुमिकेत शहरातील राजकीय पुढारी असले तरी करदाते दुधखुळे नाहीत. राजकारणापेक्षा अधिकचा टक्का समाजकारणासाठी खर्ची करण्याचा संकल्प लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करायला हवा.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin