Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


सत्तेची मुजोरी बरी नव्हे !


Main News <

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या शिक्षेमध्ये कपात करण्यावरुन पिंपरी-चिंचवड महापालिकेत रणकंदन घडले. मरगळलेल्या शिवसेनेला तरतरी आली तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेची मस्ती दाखविली. या सर्व प्रकरणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्या मंगला कदम. पाशवी बहुमताचा माज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी व नगरसेवकांना आहे. त्यात मंगला कदम या नेहमीच आघाडीवर आहेत. महापालिकेच्या भर सभेत विरोधकांना 'बजेट' मिळू न देण्याच्या, विरोधकांना बोलू न देण्याच्या धमक्या त्या वारंवार देत असतात. केवळ विरोधकच नव्हे तर स्वपक्षीय नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी, ठेकेदार कदम यांची ही सत्तेची मुजोरी अनुभवत आहेत. 

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये पानीपत झाले. राष्ट्रवादीतील प्रत्येक गटाने महापालिकेत आपापला सवतासुभा मांडला. शहराध्यक्ष योगेश बहल व सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पक्षावर पकड केली आहे. महापालिकेच्या कारभारात राष्ट्रवादीच्या इतर गटांवर मात करून 'अर्थकारणावर' अधिक भर दिला आहे. त्यांना नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार  विलास लांडे व माजी महापौर आझम पानसरे यांच्याकडून सध्या तरी कोणताच विरोध होताना दिसत नाही. त्यातच राष्ट्रवादीचे जुने शिलेदार आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपमध्ये गेले. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनाही राष्ट्रवादीतील घडामोडींशी काहीही घेणे-देणे राहिलेले नाही. योगेश बहल हे मंगला कदम यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यातच पक्षनेतेपद असल्याने कदम यांचे वागणे दिवसें-दिवस बेताल होत चालले आहे. 

महापालिकेचा स्वरसागर महोत्सव असो अथवा 'मॉडेल वॉर्ड' करण्याची योजना कदम यांचा सर्वकाही स्वतःच्या वॉर्डात करण्याचा अट्टाहास असतो. महापालिकेच्या निधीतून महोत्सव, कार्यक्रम भरवून मिरविण्याची हौस कदम यांना महापौरपदापासून लागली आहे. विशेष मुलांच्या संस्थांना अनुदान देण्यापासून ते बचतगटांपर्यंतच्या योजनांवरील हक्क कदम यांच्याशी संबंधित संस्था, गटांचाच असतो. त्या आपल्या वॉर्डात विकास कामे करतात, संस्था अथवा बचतगटांना सक्षम करतात याविषयी कोणाचेही दुमत असू शकत नाही. मात्र, दुसऱ्यांच्या तोंडचे काढून आपल्याच पदरात पाडून घेण्याचा त्यांना अट्टाहास योग्य नव्हे. शहरातील इतर अविकसित भाग, समाविष्ट गावे यांचा विचार करायला हवा. चुकीच्या पध्दतीने महापालिकेचे 'बजेट' पळविण्याचा कदम यांचा प्रताप महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय सभेत ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी उघड केला होता. संभाजीनगर येथे बस टर्मिनल्ससाठी आरक्षण उपलब्ध नसताना कदम यांनी प्रशासनाला 'बजेट'मध्ये १२० कोटींची तरतूद करायला भाग पाडले. मोठा आकडा असल्यामुळे ही चूक सर्वांच्या नजरेत आली. संभाजीनगर वॉर्डात विकास कामांसाठी केली जात असलेली तरतूद संशयास्पद असल्याची चर्चा विरोधकांमध्ये आहे. 

कदम यांची मुजोरी स्वतःच्या वॉर्डात निधी वळविण्याइतकीच मर्यादीत नाही. महापालिकेतील अनेक ठेकेदार अधिकारी 'हजेरी' लावण्यासाठी कदम यांच्या निवासस्थानी जातात. कदम यांना डावलून काम करणाऱ्या ठेकेदारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. स्वखर्चाच्या नावाखाली विदेश दौरे असो अथवा देशांतर्गत काढले जाणारे अभ्यास दौरे सर्वकाही ठेकेदारांच्या खर्चातून केले जाते हे सत्य आता लपून राहिलेले नाही. एकीकडे कामांमधील टक्केवारी आणि दुसरीकडे दौरे, सहलींसाठी जास्तीचा खर्च करावा लागत असल्याने अनेक ठेकेदार कदम यांच्यावर नाराज आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा कदम यांच्यावर वरदहस्त असल्याने दाद कोणाकडे मागणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे. बदल्यांपासून ते टीडीआरच्या प्रकरणांपर्यंतच्या सर्व कारभारावर आपलाच अंकुश कसा राहिल याची पुरेपूर काळजी कदम घेत आहेत. 

महापौरपद भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप गटाकडे असले तरी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम महापौरांच्या बरोबरीने प्रसिद्धी मिळविण्याची एकही संधी सोडत नाहीत. महापौरांना त्या जुमानतच नाहीत. उलट महापौरांना आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न त्या सातत्याने करत असतात. आपल्या समर्थक नगरसेवकांकरवी कदम यांचे पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण सुरु आहे. महापालिकेच्या सभागृहातही कदम व योगेश बहल यांच्या मर्जीनेच विषयांना मंजुरी दिली जाते. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्या बचावाचे कदम यांनी भरसभेत समर्थन करुन कळस गाठला. त्यामुळे सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा आणखीनच मलिन झाली आहे. विरोधकांना निधी न देण्याचा तसेच विषयांवर बोलू न देण्याची भरसभेत धमकी देण्यापर्यंत कदम यांची मजल गेली आहे. आकर्षक व्यक्तीमत्त्व, महिला असूनही अंगीकारलेले राजकीय कसब, महापौर असताना गाजविलेली कारकिर्द यामुळे एकेकाळी शहरवासियांमध्ये मंगला कदम यांच्याविषयी आदरयुक्त दबदबा होता. मात्र, राजकारणातील वाढता अनुभव, सत्ता आणि पदाची चढलेली धुंदी यामुळे कदम यांचे राजकीय वारु भरकटू लागले आहे. या वारुला वेळीच चाप न लावल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी महापालिका निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागू शकते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin