Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


राजकीय 'मोहरा' नको स्वतःचा ठसा उमटवा


Main News <

नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पदभार घेताच अनेक वल्गना केल्या आहेत. शहर 'वायफाय' करण्यापासून ते महिला सुरक्षा तसेच अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंतची ग्वाही दिली आहे. नव्याने पदभार, नवा जोश, नव्या घोषणा हे पिंपरी-चिंचवडकरांना आता नवीन राहिलेले नाही. मात्र, जे बोलले ते अंमलात आणणारे डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारखे आयुक्तही शहराला भेटले. परंतु, राजकीय झुंडशाहीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. राजीव जाधव हे तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा 'मोहरा'च बनले. त्यांनीही अनेक घोषणा केल्या. मात्र, कामकाजाच्या बाबतीत ते 'आरंभशूर'च ठरले. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त वाघमारे यांच्याकडून शहरवासियांना अनेक अपेक्षा आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने त्यांची कसोटी पणाला लागणार आहे. 

सुमारे साडेसतरा लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या नागरीकरणाबरोबरच अनेक आव्हाने 'आ' वासून उभी आहेत. पुणे, मुंबईच्या तुलनेत शहराचा चांगल्या पध्दतीने विकास झाला असला तरी अनधिकृत बांधकाम, रेडझोन, पूररेषा, कोर्ट-कचेऱ्यांमध्ये अडकलेले महापालिकेचे झोपडपट्टी पुनर्वसनासारखे प्रकल्प यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचे शहराला ग्रहण लागलेले आहे. हे शहर म्हणजे कामगारनगरी मात्र, ही ओळख आता पुसत चालली आहे. शहरातून अनेक नामांकित उद्योग बाहेर गेले. तर औद्योगिक भुखंडांच्या निवासीकरणाची कीड लागल्याने उरले-सुरले उद्योगही येथून काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहराचा रोजगार धोक्यात आला आहे. स्थानिक प्रशासक म्हणून यापूर्वीच्या आयुक्तांनी ही बाब गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे नवनियुक्त आयुक्तांकडून उद्योजक व कामगारांच्या अपेक्षा आहेत. 

शहरातील अंतर्गत भागांमधील रस्ते रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत आहेत. समाविष्ट गावांचा विकास रखडला आहे. घरकुल योजनेचा दुसरा टप्पा अधांतरी आहे. एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. बीआरटीएसचे सर्व मार्ग खुले करण्याला 'ब्रेक' लागला आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे काही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प धुळ खात पडून आहेत. शहराला चोविसतास पाणीपुरवठा, नदी सुधार प्रकल्प, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रकल्प अद्याप कागदोपत्री आहे. वादग्रस्त पवना बंद जलवाहिनी योजनेचा सोक्षमोक्ष अद्याप लागला नाही. शहरासाठी भामाआसखेड अथवा आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला गती मिळणे गरजेचे आहे. शहराचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. शहरातील वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे. पार्किंग झोन, हॉकर्स झोनची निर्मिती करणे गरजेचे आहे. ही कामे मार्गी लावतानाच अनधिकृत बांधकामांना आवर घालणे आयुक्तांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराला लाभलेल्या प्रत्येक आयुक्तांची कार्यपध्दत वेगवेगळी होती. त्यापैकी मोजक्याच आयुक्तांनी स्वतःच्या कामाची छाप उमटविली. दिलीप बंड यांच्या कार्यकाळात पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाबरोबरच ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असे मोठ-मोठे प्रकल्प मार्गी लागले. मात्र, "राष्ट्रवादी प्रणित आयुक्त" अशी त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर आलेले आशीष शर्मा यांनी महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित केली. राजकारण्यांपासून हातचे राखून राहिल्याने कोणत्याही वादात ते अडकले नाहीत. त्यांच्यानंतर आलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांनी खऱ्या अर्थाने कामाची धडाडी दाखविली. मात्र, ही धडाडीच त्यांच्या बदलीचे कारण ठरले. राजकीय रोषातून चांगला अधिकारी शहरवासियांनी गमाविला. त्यानंतर आलेले राजीव जाधव यांची कारकीर्द अत्यंत निष्क्रीय ठरली. आश्वासने द्यायची, घोषणा करायच्या मात्र, प्रत्यक्षात काहीही करायचे नाही, अशी त्यांची कार्यशैली होती. त्यामुळे शहर विकासाने मागील काही वर्षात घेतलेला विकासाचा वेग मंदावला आहे. त्याला नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे गती देतील, अशी शहरवासियांना अपेक्षा आहे. राजकीय 'मोहरा' नव्हे  तर स्वतःचा ठसा उमटवून त्यांना काम करावे लागणार आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin