Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना


Main News <

पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये गट-तट हा प्रकार तसा नवीन नाही. यापूर्वी गडकरी-मुंडे गटातील वादामुळे शहरात पक्ष वाढीला ओहोटी लागली. या दोन्ही गटांमधील संघर्ष कायम असतानाच आता त्यात 'नवे' व 'जुने' या वादाची भर पडली आहे. मोदी लाटेचा प्रभाव, केंद्र व राज्यातील सत्ता आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रवेशामुळे शहर भाजपला मूठभर मांस चढले. महापालिकेत सत्तेची स्वप्ने पडू लागलेल्या भाजपने राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांच्याच तालमीत तयार झालेले आमदार लक्ष्मण जगताप यांना शहराध्यक्षपदी बसविले. मात्र, जुन्यांमध्ये असलेला 'इगो' आणि 'हम करे सो कायदा' ही आमदार जगताप यांची कार्यपध्दती यामुळे शहर भाजपमध्ये तीव्र वर्चस्ववाद सुरु झाला आहे. यातून कुरघोडी, एकमेकांची जिरवा-जिरवी, वरिष्ठांकडे कागाळी या राजकारणाला ऊत आला आहे. या वादंगामध्ये 'आई जेवू घालेना अन्‌ बाप भिक मागू देईना' अशी अवस्था भाजपमधील जुन्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबरच नव्याने आलेल्यांचीही झाली आहे. 

मुंडे व गडकरी गटातील वादामुळे अंकुशराव लांडगे यांच्या निधनानंतर भाजपला एकसंघ ठेवेल, असा शहराध्यक्ष मिळाला नाही. एका गटाचा शहराध्यक्ष झाला की दुसऱ्या गटाने त्यावर कुरघोडी करण्याची हे गेली अनेक वर्षे भाजपमध्ये घडत आहे. भाजपच्या या अंतर्गत वादामुळे भाजपच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना विरोधी पक्षांकडे लक्ष द्यायला वेळ मिळालाच नाही. त्याचा लाभ विरोधी पक्षांनी वेळोवेळी उठविला. परिणामी भाजप रसातळाला गेला. मागील महापालिका निवडणुकीत अवघे तीन नगरसेवक भाजपच्या पदरात पडले. भाजपच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असताना 'मोदी लाटे'ने पक्षाला तारले. त्यातच आमदार जगताप यांच्या प्रवेशामुळे शहर भाजपला 'अच्छे दिन' आले. स्थानिक त्यातच मनी, मसल पॉवरमध्ये राष्ट्रवादीला तोडीस तोड असल्याने आमदार जगताप यांच्या माध्यमातून महापालिकेत कमळ फुलविण्याची स्वप्ने भाजपला पडू लागली आहेत. मात्र, जुन्या व नव्यांमध्ये सुरु असलेल्या वर्चस्ववादामुळे हे स्वप्न भंगणार, अशी भिती सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना सतावत आहे. 

वास्तविकता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेली घुसमट आणि मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी आमदार जगताप भाजपमध्ये आले. 'भाऊं'वरील प्रेमामुळे त्यांचे समर्थकही भाजपमध्ये डेरेदाखल झाले. मात्र, भाजपची स्वतःची एक कार्यप्रणाली आहे. त्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावे लागतात. आमदार जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये एकहाती निर्णय घेण्याची मुभा होती. अजित पवार यांचे त्यांना पाठबळ होते. मात्र, भाजपमध्ये या उलट परिस्थिती आहे. सर्वसहमतीने, सांघिक विचाराने निर्णय घ्यावे लागतात. "पाठीवर हात ठेवून लढ" म्हणणारा नेता त्यांना भाजपमध्ये अद्याप मिळालेला नाही. पूर्वी आमदार जगताप यांना त्यांचे तत्कालीन कट्टर प्रतिस्पर्धी खासदार श्रीरंग बारणे व आझम पानसरे यांचे आव्हान होते. मात्र, आता लक्ष्मण जगताप यांना अजित पवार यांच्याशी देखील दोन हात करावे लागणार आहेत.  त्यामुळे त्यांना आपल्या कार्यपध्दतीत बदल करावा लागणार आहे. अन्यथा पक्षांतर्गत लढता लढता त्यांची ताकद क्षीण होईल. अशा परिस्थितीत विरोधकांचा सामना करताना त्यांना धारातिर्थीच पडावे लागणार हे निश्चित. 

पक्षात नव्याने जे आले ते परग्रहावरुन अथवा परदेशातून आल्याची वागणूक जुन्यांनी देणे हा देखील उद्दामपणा म्हणावा लागेल. सध्या जे स्वतःला जुने, निष्ठावान म्हणत आहे. त्यांच्याच हातात इतकी वर्षे पक्षाची सूत्रे होती. मग त्यावेळी त्यांना स्वतःचा करिष्मा का दाखविता आला नाही, हा खरा प्रश्न आहे. मागील काळात पक्ष रसातळाला का गेला याची कारणीमिमांसा त्यांनी करायला हवी. मागील काळात त्यांच्या हातून घडलेल्या चुका दुरुस्त करायला हव्या. पक्षातील जुने-जाणते असल्याने मार्गदर्शकाची भूमिका स्विकारायला हवी. मात्र, हे जुने-जाणते आपल्यावर अन्याय होत असल्याचे गाऱ्हाणे गात पक्षश्रेष्ठींचे कान फुंकण्यात धन्यता मानत आहेत. शहराध्यक्षांनी योजिलेला कार्यक्रम हाणून कसा पाडायला, त्याबाबत वरिष्ठांकडे 'कान भरणी' कशी करायची यातच बहुसंख्यजण व्यस्त आहेत. जुने-जाणते यांनी मागील काळात आपली कार्यक्षमता दाखविली असती तर पक्षात नव्याने आलेल्या आमदार जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे देण्याची वेळ पक्षश्रेष्ठींवर आली नसती याचा विचारही अश्यांनी करायला हवा. 

शहरातील जुन्या व नव्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या वर्चस्ववादाच्या या लढाईत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हाल होत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा आहे. त्यांच्या जोरावरच नेत्यांची मिजास आहे, हे विसरुन चालणार नाही. सत्ता नसताना, पक्षाच्या पडत्या काळातही पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेची पावती देण्याची आता वेळ आली आहे. जुन्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत असेल तर त्यांना विश्वासात घेण्यात आपण कुठे कमी पडलो का, याचा विचार शहराध्यक्ष आमदार जगताप यांनी करायला हवा. अन्यथा भाजपमध्ये येणाऱ्यांचा जेवढा ओढा आहे. तेवढाच ओढा नाराज होईन भाजपमध्ये बाहेर पडणाऱ्यांचा असेल, याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीसोबत काम करताना केलेल्या चुकांची भाजपमध्येही जगताप यांनी पुनरावृत्ती केल्यास पुन्हा तीच घुसमट आणि तोच विरोध इथेही त्यांना सहन करावा लागणार आहे. भाजपमधील सर्वच नवख्या व जुन्या-जाणत्यांनी एकीचे बळ दाखविले तरच त्यांना महापालिकेत सत्तेचे फळ मिळू शकते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin