Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


अशा नगरसेवकांचे करायचे काय?


Main News <

पिंपरी-चिंचवड बुलेटिनने आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांशी संवाद साधला. प्रभागनिहाय इच्छूकांशी संवाद साधताना बहुसंख्य प्रभागात नगरसेवक फिरकत नाहीत, नगरसेवकांची दहशत, एकाच प्रभागातील दोन नगरसेवकांमधील व्दंव्द, नगरसेवकांच्या भांडणात प्रभागाच्या विकासाचा बट्ट्याबोळ, महापालिकेच्या मिळकती नगरसेवकांनी बळकाविण्याचे प्रकार अश्या एक ना बारा भानगडी समोर आल्या. हे इच्छूक नगरसेवकांचे विरोधक म्हणूनही त्यांच्याकडून काही आरोप होत असतील, मात्र, सगळेच इच्छूक एकाच सुरात बोलत असल्याने कुठे तरी पाणी मुरतेय हे निश्चित. केवळ नगरसेवक म्हणून मिरविण्यासाठी मनी, मसल, पॉवरचा वापर करुन निवडणुका जिंकायच्या आणि निवडून आल्यानंतर मतदारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार कधी थांबणार हा खरा प्रश्न आहे. 

पिंपरी-चिंचवड ही एकेकाळची आशिया खंडातील श्रीमंत महापालिका. मात्र, येथील राजकीय कारभाऱ्यांनी महापालिकेच्या कर्जाच्या खाईत लोटले. विकास कामांमध्ये घर बसल्या टक्केवारी मिळविणे, महापालिकेचे कंत्राट स्वतःच्या नातेवाईकांना अथवा कार्यकर्त्यांना देऊन त्याव्दारे विनापरिश्रम मलिदा लाटणे, नगरसेवक म्हणून महापालिकेच्या सुखसोई लाटणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज अनेक नगरसेवक काम करत आहेत. व्दिसदस्यीय प्रभाग पध्दतीत गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या महापालिकेच्या कारभारात नगरसेवकांनी प्रभाग निम्मा-निम्मा वाटून घेतल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागातील रस्ते प्रशस्त आणि चकाचक आहे. मात्र, उपनगरे, समाविष्ट गावांमध्ये आजही मूलभूत सोई-सुविधांची वाणवा आहे. नगरसेवकांचा मनमानी कारभार हा मतदारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. महापालिकेची अनेक सांस्कृतिक केंद्रांचा ताबा नगरसेवकांनी आपल्याकडे घेतला आहे. याठिकाणी विरोधक अथवा सर्वसामान्यांना वावर करण्याची मुभा नाही. दुर्देवाने महापालिका प्रशासन देखील अश्या नगरसेवकांच्या सोईचे कामकाज करत आहे. त्यामुळे असे नगरसेवक महापालिका विकायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत, असा संताप शहरवासिय व्यक्त करत आहेत. 

काही नगरसेवक वॉर्डात फिरकत नसल्याची तक्रार इच्छूकांनी केली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. दुर्देवाने अशा नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा नाही. महापालिका सर्वसाधारण सभेला काही नगरसेवक वारंवार दांड्या मारतात. तरीही, पद वाचविण्यासाठी आपल्या सोईनुसार हे नगरसेवक महापालिकेत येऊन हजेरीच्या सह्या करुन जातात. सभेचा भत्ता बिनबोभाट लाटतात. सभेला येणाऱ्या नगरसेवकांची 'बायोमेट्रीक' पध्दतीने हजेरी घेण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे. मात्र, नगरसेवकांच्या सोईसाठी या मागणीला वारंवार वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे. बहुसंख्य नगरसेवकांनी आपले नातेवाईक, कार्यकर्त्यांना कंत्राटदार म्हणून महापालिकेच्या कारभारात उतरविले आहे. मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या उलट कारभार पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. दुर्देवाने सत्ताधारी असो अथवा विरोधक कोणीही याबाबत तोंड उघडायला तयार नाही. "तेरी भी चूप ; मेरी भी चूप" अश्या पध्दतीने एकमेकांना पाठिशी घालण्याचे काम सुरु आहे. श्रेयवाद, वर्चस्ववादासाठी बहुसंख्य नगरसेवकांची दहशत आहे. मूळात अनेक नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पोलीस यंत्रणा देखील अशा नगरसेवकांच्या दावणीला बांधलेली असल्याने सर्वसामान्यांना मूग गिळून बसण्याखेरीज पर्याय नाही.     

महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतरही ही पहिलीच पंचवार्षिक आहे. मात्र, बोटावर मोजता येईल इतक्याच नगरसेविका स्वबळावर काम करतात. त्यांच्या कामकाजात त्यांच्या पतीराजाची अथवा नातेवाईकाची लुडबूड नाही. उर्वरित नगरसेविका नामधारी आहेत. मागील अनेक महापालिका निवडणुकीत पैश्यांचा पाऊस पडत आहे. अनेक गुंठामंत्री नगरसेवक पद लावून घेण्यासाठी पैश्यांचा धुराळा करत आहेत. उच्चभ्रू वस्तीतील मतदार निवडणूक इच्छूकांकडून इमारतींना रंगरंगोटी, पेव्हिंग ब्लॉक बसवून घेतात. त्याच्या अमिषावर निवडून आलेले गुंठामंत्री नंतर प्रभागात फिरकत देखील नाहीत. साधे शिफारसपत्र देखील या नगरसेवकांकडून मिळू शकत नाही. याबाबत जाब विचारायला गेल्यास निवडणुकीत एका मतासाठी किती पैसे मोजले याची आठवण हे नगरसेवक करुन देतात. यामध्ये चूक मतदारांचीही आहे. आगामी महापालिका निवडणूक जेमतेम अकरा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नगरसेवक पदाला न्याय न देणाऱ्या, पदाच्या जोरावर मुजोरी करणाऱ्या नगरसेवकांचे करायचे काय, याचा विचार मतदारांनी आत्तापासूनच करायला हवा.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin