Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


आयजीच्या जीवावर "ताई" उदार !


Main News <

आयजीच्या जीवावर बायजी उदार अन्‌ करदात्यांच्या पैश्यांवर लोकप्रतिनिधी सुभेदार, अशी काहीशी प्रचिती पिंपरी-चिंचवडकरांना येत आहे. हे सांगण्याचे औचित्य म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संभाजीनगरमध्ये भरलेला स्वरसागर महोत्सव. या महोत्सवाचा राजकीय व्यासपीठ म्हणून होत असलेला वापर पाहता याला स्वरसागर महोत्सव म्हणावा का, असा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्याच्याकडे सत्ताबल त्याने आपल्या वॉर्डात हा कार्यक्रम राबवायचा, असाच काहीसा हेतू गेली अनेक वर्षे हा महोत्सव भरविण्यामागे होत आहे. महापालिकेकडून स्वरसागर महोत्सव भरविला जातो, याचा विसर शहरातील इतर भागातील नागरिकांना पडला आहे. 

पुणे महापालिकेच्या सवाई गंधर्वच्या धर्तीवर १९९८ पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वसागर महोत्सवाला सुरुवात झाली. प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानात पहिला महोत्सव झाला. शहरवासियांसाठी शास्त्रीय संगीत व नृत्याची पर्वणी, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता. महोत्सवाचे यंदाचे १८ वर्ष होते. गेली १३ वर्षे या महोत्सवांतर्गत अनेक दिग्गज कलाकारांना स्वरसागर पुरस्कार महापालिकेमार्फत दिला गेला. हा महोत्सव सुरु करण्यामागचा महापालिकेचा उद्देश खूप मोठा होता. मात्र, त्यात राजकारण शिरल्याने तो आता संकुचित स्वरुपाचा झाला आहे. हा महोत्सव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अथवा वेगवेगळ्या भागांमध्ये भरविणे गरजेचे होते. महापालिका या महोत्सवावर सुमारे २५ लाख रुपये खर्च करते. त्याचा सर्व भागातील शहरवासियांना लाभ मिळणे गरजेचे आहे. मात्र, 'स्वरसागर'चा वापर 'चमकोगिरी'साठी होऊ लागल्याने त्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला जात आहे. 

आपआपल्या भागात स्वरसागर महोत्सव व्हावा, ही प्रत्येक नगरसेवकाची इच्छा असते. मात्र, स्वरसागर महोत्सव संभाजीनगर प्रभागापुरता मर्यादीत झाला आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तारुढ पक्षनेत्या स्वपक्षीयांना तसेच महापालिका प्रशासनाला अक्षरशः दमदाटी करुन हा महोत्सव संभाजीनगरमध्ये भरवितात. शहराच्या एका कोपऱ्याला असलेल्या या महोत्सवाचा शहरातील उतर नागरिकांना आनंद मिळत नाही. त्यामुळे मोजकेच रसिक या महोत्सवाला हजेरी लावतात. महोत्सवात सादरीकरणासाठी येणाऱ्या कलाकारांनाही ही बाब खटकते. मात्र, "गर्दी पेक्षा दर्दी  हवेत", असे जाहीरपणे सांगत या कलाकारांनी अनेकवेळा वेळ मारुन नेली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही आपल्या प्रभागात हा महोत्सव भरविण्याची इच्छा असते. मात्र, "ताईं"च्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालत नाही. अन्यथा अजितदादांपर्यंत तक्रार गेलेली असते. विरोधकाना तर "ताईं"पुढे बोलण्याची सोय नाही. स्वरसागर महोत्सवाची फ्लेक्सबाजी पाहिली तर हा महोत्सव महापालिकेने भरविला की "ताईं"नी असा प्रश्न पडतो. "ताईं"नी स्वखर्चानेच हे सगळे जमवून आणले की काय, असे भोळ्या-भाबड्या करदात्याला वाटते. स्वसागरच्या व्यासपीठावर कलाकारांपेक्षाही "ताईं"चाच बोलबाला अधिक असतो. स्वपक्षीय नेत्यांनाही "ताई" या महोत्सवापासून दूर ठेवतात. महापौर देखील केवळ दीप प्रज्ज्वलनापुरत्या असतात. त्यामुळे स्वरसागर महोत्सवाचे संभाजीनगर महोत्सव असे नामकरण करुन टाका, अशी टीपण्णी "ताईं"चे स्वपक्षीयच करत आहेत. 

स्वसागर महोत्सवच नाही तर महापालिकेची कोणतीही नवीन योजना पहिली आपल्याच प्रभागात राबवायचा हट्ट "ताईं"चा असतो. शहराचे महापौरपद भूषविले असताना केवळ "व्होट बँक" जपण्यासाठी "आयजीच्या जीवावर "ताईं"चा हा उदार होण्याचा प्रयत्न लाजिरवाणा आहे. वास्तविकतः करदात्यांच्या खर्चातून 'चमकोगिरी'ची हौस भागविण्यात पिंपरी-चिंचवडचे लोकप्रतिनिधी अग्रेसर आहेत. भले 'चमकोगिरी' का होईना, परंतु, करदात्यांच्या पैश्याचा विनियोग सर्वांसाठी समान पध्दतीने व्हावा, ही शहरवासियांची माफक अपेक्षा आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधींच्या हौसेखातर त्याच-त्याच भागात महापालिकेचे कार्यक्रम घेतले जातात. महापालिकेची यंत्रणा त्यासाठी फुकट राबविली जाते. हे अन्यायकारक आहे. ज्याला ही हौस भागवायची असेल ती त्यांनी स्वखर्चाने भागवावी, त्यासाठी महापालिकेच्या पैश्याचा वापर  आणि त्यावर स्वतःची 'चमकोगिरी' कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वरसागर महोत्सव कुठे भरवावा, याचे काहीतरी धोरण ठरवायला हवे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अथवा दरवर्षी क्षेत्रीय स्तरावर महोत्सव भरविला जावा. तरच त्याचा लाभ सर्व शहरवासियांना होऊ शकतो. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin