Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


हेल्मेटसक्तीचा बागुलबुवा


Main News <

एखाद्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरुन जुना वाद संपत नाही तोच नवीन 'टुम' काढून वातावरण अस्थीर करण्याचे काम राज्यकर्ते करत असल्याचे मागील काही घटनांवरुन दिसून येत आहे. सध्या हेल्मेटसक्तीची 'टुम' निघाली आहे. जिथे जिविताच्या संरक्षणाचा मुद्दा आहे, तेथे कोणत्याही सक्तीसाठी तडजोड होवू नये, परंतु, दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती हे म्हणजे अतीच झाले. हेल्मेटसक्तीचा बागुलबुवा करणाऱ्या राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी न्यायालयाच्या आदेशाची ढाल पुढे केली आहे. हेल्मेटसक्तीचा निर्णय हा चांगलाच आहे. मात्र, त्याचा जो बागुलबुवा केला जात आहे, तो सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळेच त्यांचा हेल्मेटसक्तीला वाढता विरोध आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातग्रस्त वाहनचालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सांगत हेल्मेटसक्तीचे समर्थन केले जात आहे. मात्र, अपघात झाल्यानंतर हेल्मेटमुळे डोके वाचवेल ही अपेक्षा करण्यापेक्षा अपघात होऊच नयेत यासाठी वाहतूक नियमांची सक्ती केली असती तर सर्वसामान्यांनी त्याचे निश्चित कौतुक केले असते. हेल्मेट सक्तीसारखा चांगला निर्णय होऊनही सर्वसामान्यांचा त्याला विरोध का, याचा विचार शासनाने करायला हवा. 

शहरातील मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. ग्रामीण भागात रस्तेच नाहीत. आजही अनेक महामार्गांचे रुंदीकरण रखडले आहे. मोठमोठाले खड्डे या रस्त्यांवर 'आ' वासून आहेत. रस्ते मानांकाचा विचार न करता रस्त्यांवर चुकीच्या पध्दतीने गतीरोधक बसविण्यात आले आहेत. या गतीरोधकांमुळे अनेक बळी गेले आहेत. अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेले मुख्य चौक, रस्त्यांमुळेही अपघात होत आहेत. ठराविक महामार्ग सोडले तर वाहनांच्या वेगावर कोणतीही मर्यादा नाही. अनेक भागांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत. ते असले तरी 'सिग्नल' तोडण्याची घाई अनेकांना झालेली असते. अल्पवयीन मुले बेदरकारपणे वाहने हाकतात. वयाची पन्नासी उलटली तरी अनेकांकडे वाहन परवाने नाहीत. ज्यांच्याकडे आहेत ते देखील शासकीय कागदपत्राचा पुरावा म्हणून त्याचा वापर करतात. वाहन परवाना असलेल्या प्रत्येकालाच वाहतुकीचे नियम मुखोद्‌गत असतीलच असे नाही. पादचाऱ्यांचा चालण्यासाठी पदपथ नाहीत. पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. रात्रीच काय दिवसादेखील मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. धोकादायक वळणे, रहदारीच्या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात आलेले नाहीत. चौकांमध्ये, वळणमार्गावर धोकादायक पध्दतीने फ्लेक्स लावले जातात. मात्र, अशा फ्लेक्सवर कारवाई होत नाही. जिथे रस्ता आणि वाहतूक नियमांच्या पालनाची सुरक्षा नाही, तिथे डोक्यावर हेल्मेट सुरक्षेची सक्ती करुन कितपत फायदा होणार, असा प्रश्न उपस्थित होतो. 

रस्ता सुरक्षेबरोबरच वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीला कुठेतरी लगाम घातला गेला पाहिजे. वेडीवाकडी वाहने चालवून "रोड शो" करणाऱ्या रोडरोमिओंची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. मात्र, पोलिसांना ते दिसत नाही. आयते सावज सापडल्यासारखे चौकात ऐन सिग्नलला प्रामाणिकपणे थांबलेल्या वाहनचालकांना बाजूला वाहन घ्यायला सांगितले जाते. वाहन परवान्याची मागणी केली जाते. तो दाखविला की पीयुसीची मागणी होते. ते दाखविले की कागदपत्रांची मागणी केली जाते. तरीही पुन्हा शंभर, दोनशे रुपयांसाठी हात पुढे होतोच. त्याची पावती वाहनचालकांना मिळत नाही. पोलिसांना याबाबत जाब विचारायला गेल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होतो. केवळ 'चिरीमिरी'मुळेच पोलिसांचा धाक वाहतूक नियम मोडणाऱ्यावर राहिलेला नाही. शंभर-दोनशे रुपये दिले की आपली सुटका, असा ग्रह कित्येक वाहनचालकांचा झाला आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. हेल्मेटसक्तीमुळे सध्या हेल्मेट विक्रीचा काळाबाजार सुरु झाला आहे. तोंडाला येईल, त्या किमतीला हेल्मेटची विक्री सुरु आहे. यावर शासन अथवा पोलीस यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नाही. यामध्ये सर्वसामान्यांची नाहक ससेहोलपट होत आहे. 

पादचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत आहे. मग त्यांनीही हेल्मेट घालून रस्त्यावर फिरावे का?, चारचाकी वाहनांच्या अपघातामध्ये सर्वाधिक नुकसान होते. मग त्यांनीही हेल्मेट घालूनच वाहनांमध्ये बसायचे का असे एक ना अनेक प्रश्न आहेत. आजाराचे मूळ शोधण्यापेक्षा वरवरची मलमपट्टी अधिक रोग पसरविण्यास कारणीभूत ठरत असते. चांगल्या निर्णयाची सक्ती करण्याची वेळ का येते, याचा विचार राज्यकर्त्यांनी गांभिर्याने करायला हवा. वाहनचालकांच्या जिविताची राज्यकर्त्यांना खरच काळजी असेल तर रस्ते सुरक्षेतील सर्व त्रुटी दूर करायला हव्यात. तसे झाल्यास सर्वसामान्य हेल्मेटच काय तर राज्यकर्त्यांनाही डोक्यावर घेतील. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin