Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


जुने जाऊ द्या मरणालागुनी...!


Main News <

पाहता-पाहता २०१५ हे वर्ष सरले. या वर्षभरात काय कमविले, काय गमविले याचा ताळेबंद प्रत्येकजण करत आहे. शहराचा आढावा घेता पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसाठी हे वर्ष जसे आले तसे गेले असेच म्हणावे लागेल. औद्योगिक, बांधकाम क्षेत्रातील मंदी, कासवगतीने सुरु असलेली विकास कामे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात असलेली वादळापूर्वीची शांतता यामुळे २०१५ च्या पाऊलखुणा पुसट ठरणाऱ्या आहेत. विकास कामांच्या बाबतीत शहर जेवढे पिछाडीवर गेले तेवढेच गुन्हेगारीच्या बाबतीत यंदाचे वर्ष चांगलेच गाजले. 

महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या संथगतीच्या कारभारामुळे विकास कामांच्या बाबतीत तर शहर एका वर्षात खूप मागे पडले. आयुक्त जाधव हे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काही पदाधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतंत्र अशी कामाची छाप पाडता आलेली नाही. रखडलेली 'बीआरटी' बससेवा वगळता यावर्षी एकही मोठा प्रकल्प पूर्णत्वाला येऊ शकला नाही. एखादा धोरणात्मक निर्णय आयुक्त घेऊ शकले नाहीत. वॉर्डसभांना सुरुवात झाली खरी मात्र, त्याला वर्षाच्या सरतेशेवटी नगरसेवकांच्या हाणामारीचे गालबोट लागले. शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांचा महापालिका प्रशासनाकडून होणारा पाठपुरावा कमी झाला आहे. त्यामुळे राजकीय पाठपुराव्यावरच या प्रलंबित प्रश्नांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रशासकीय कामकाजात सावळा गोंधळ सुरु आहे. आयुक्तांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. त्यामुळे बेशिस्त कारभाराबरोबरच खाबुगिरीला उधाण आले आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे नवीन वर्ष महापालिकेसाठी अत्यंत खडतर आहे.

महापालिकेच्या २०१७ मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वादळापूर्वीची शांतता वर्षभर अनुभवायला मिळाली. सत्ताधाऱ्यांविरोधात भाजपने आक्रमक पावित्रा घेत 'मिशन महापालिका'चा नारा दिला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेमुळे हत्तीचे बळ प्राप्त झालेले शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते भलतेच हवेत असल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसची चांगलीच वाताहत झाली आहे. त्यातच वॉर्डसभेत काँग्रेसच्याच नगरसेवकांमध्ये झालेली हाणामारी, महिला व बालकल्याण समिती सभापती असलेल्या काँग्रेसच्या गीता मंचरकर यांना झालेली मारहाण यामुळे काँग्रेसची पुरती बदनामी झाली. दोन-दोन खासदार असूनही विधानसभा निवडणुकीत भोसरी व चिंचवड विधानसभा मतदार संघात झालेल्या पराभवातून शिवसेना सावरु शकली नाही. मात्र, दोन खासदारांमधील श्रेयवादाची लढाई तीव्र झाली. मनसेच्या शहराध्यक्षपदाचा तिढा वर्षभरात सुटला नाही. महापालिका निवडणुकीसाठी अवघा एकच वर्षाचा कालावधी उरल्याने सर्वच पक्षांसाठी नवे वर्ष पळता भुई थोडे करणारे आहे. 

डॉ. बसवराज तेली यांच्यासारखे तरुण, उच्चशिक्षित पोलीस उपायुक्त शहराला लाभले. मात्र, ते रुजू झाल्याच्या दिवसांपासूनच वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरु झाले. ते वर्षअखेरीपर्यंत कायम राहिले. गुंडाकडून वाहन तोडफोडीच्या सर्वाधिक घटना या वर्षात घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा खून, चिंचवडमध्ये तडीपार गुन्हेगाराचा धुमाकूळ, एका रात्रीत ३२ वाहनांची तोडफोड, गँगवॉर अश्या घटनांनी शहर हादरले. महिलांबरोबरच पुरुषांच्याही सोनसाखळी चोरी, बलात्कार, किरकोळ कारणावरुन खून, घरफोड्या या घटना पोलीस यंत्रणेसाठी आव्हान ठरत आहेत. नगरसेवक टेकवडे खून प्रकरण, वाल्हेकरवाडीतील कथित दरोडा प्रकरण अश्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. मात्र, पोलीस व गुन्हे शाखेचे अधिकारी यांच्यातील 'श्रेयवादंग' विकोपाला गेला आहे. महापालिका निवडणुकीत उंबरठ्यावर आल्याने नववर्ष पोलिसांसाठी आणखीनच तापदायक ठरणार आहे. सरत्या वर्षात काय चुकले आणि गुन्हेगारी का फोफावली याचा अभ्यास पोलिस यंत्रणेला करावाच लागणार आहे. 

२०१५ मधील पावसाच्या लहरीपणामुळे नववर्ष शहरवासियांसाठी तीव्र पाणी टंचाईचे संकट घेऊन येत आहे. पाणी बचतीचा, पाणी पुर्नवापराचा संकल्प शहरवासियांनी नववर्षात करायला हवा. महापालिका निवडणुकीची धामधुम सुरु होत असल्याने शहरवासियांना नगरसेवकांच्या कामकाजाचे 'अच्छे दिन' अनुभवायला मिळणार आहेत. चार वर्षे रखडलेली वॉर्डा-वॉर्डातील विकास कामे आता सुरु होतील. महापालिकेच्या खर्चातून सोई-सुविधांचा वर्षाव सुरु होईल. मात्र, भविष्यकाळाची पाऊले भक्कम करण्यासाठी नागरिकांनी वेळीच जागरुक व्हायला हवे. केशवसुत सांगतात त्याप्रमाणे 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' म्हणत सर्वांनीच नव वर्षात नव निश्चयाने पुढे गेले पाहिजे.  नवे वर्ष शहरवासियांच्या आयुष्यात आशांचे, आनंदाचे आणि शांततेचे संचित घेऊन येवो याच नववर्षाच्या शुभेच्छा !

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin