Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -संपादकीय


महापालिका निवडणुकीची दिवाळी अन्‌ राजकीय फटाके


Main News <

अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विजयाची दिवाळी साजरी करण्यासाठी आत्तापासूनच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. सद्यःस्थिती पाहता राष्ट्रवादीचीच दिवाळी जोरात असेल असे चित्र आहे. मात्र, चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि नगरसेवकपदाने राष्ट्रवादी तर 'आमदारकी'ने अपक्ष असलेले भोसरीचे महेश लांडगे यांच्या भुमिकेवर राष्ट्रवादीचा सुतळी बॉम्ब फुटणार की फुसका निघणार हे ठरणार आहे. 'बिहारी' आणि 'कोल्हापुरी बॉम्ब'मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भुईनळे थुईथुई उडत आहे. कल्याण-डोंबिवलीतल्या विजयोत्सवामुळे शिवसेनेचे फुलबाजे तडतड करु लागले आहेत. मनसे आणि आरपीआयच्या टिकल्या वाजविण्यासाठीच्या बंदुका अजून मुंबईतच आहेत. एमआयएमची लवंगी लड केवळ वात पेटविण्याच्या प्रतीक्षेत आहे.

 

सध्या चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांकडे फटाक्यांचा मोठा स्टॉक आहे. शिवसेनेच्या दोन्ही खासदारांपैकी एक खासदार फटाक्यांचा अर्धा स्टॉक माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे पाठविण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अज्ञातवासात गेलेले विलास लांडे हे महापालिका निवडणुकीसाठी ' डबल बार रॉकेट' सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र, हे रॉकेट कोणाच्या बाटलीतून सोडायचे याची चाचपणी ते सध्या करत आहेत. महेश लांडगे यांच्या रॉकेटला भेदून पुढे जाऊ शकेल अशी बाटली आणि ठिकाण ते शोधत आहेत. त्यामुळे सध्या तरी लांडे यांनी शिवसेना खासदारांकडून येऊ घातलेला फटाक्यांचा साठा तुर्तास मागे पाठविला आहे. भोसरीतील अनेक जुने-जाणते लांडगे व लांडे फटाक्यांमध्ये जुगलबंदी लावून आपली दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  हे दोन्ही फटाके एकत्र येवून दिवाळी साजरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीतील लांडगे गटाची विजयी आतषबाजी लांडे गट विसरायला तयार नाही.

 

शिवसेनेच्या दुसऱ्या खासदारांकडील फटाक्यांचा 'स्टॉक' चिंचवड आणि पिंपरीत पुरवून वापरला जात आहे. चिंचवडबरोबरच पिंपरीची सगळी भिस्त या खासदारांवरच आहे. सद्यःस्थिती पाहता शिवसेनेकडे मोजकेच फटाके असल्याने हे खासदार शिवसेनेची दिवाळी साजरी करण्यासाठी इतर पक्षांमधील दुखावलेलेहौश्या-गवश्यांच्या शोधात आहेत. महापालिका निवडणुकीतील दिवाळीत सर्वाधिक कोणाच्या फटाक्यांचा 'आव्वाज' असेल याची अघोषित स्पर्धा आत्तापासूनच शिवसेनेत सुरु झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपआपला फटाक्यांचा दारुगोळा जमा करण्यात व्यस्त आहे. पद असूनही कार्यकर्त्यांमध्ये 'पत' नसल्यामुळे भाजप खासदार आणि शहराध्यक्षांना फटाके वाजविण्यासाठी चिंचवडच्या आमदारांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

 

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध फटाके एकत्र करण्यात शहराध्यक्षांना बऱ्यापैकी यश आले आहे. चिंचवड व भोसरीच्या आमदारांकडील फटाक्यांची रसद स्वगृही आणण्याबरोबरच कारभारी 'दादां'ची  थोडीशी साथ आणि 'शेठ', ताई आणि दोन भाईंची मोट बांधण्यात शहराध्यक्षांना यश आल्यास राष्ट्रवादीची दिवाळी जोरात असेल हे निश्चित. देशभरात भाजपविरोधी वाढता सूर, बिहार विधानसभेबरोबरच कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतल्या निवडणुकीत 'मोदी लाट' ओसरल्याचा अनुभव आल्याने काँग्रेसच्या गोटात चैतन्याची दिवाळी सुरु झाली आहे. काँग्रेसमधील फुसके फटाके अडगळीत टाकून नव्या, ताज्या दमाच्या फटाक्यांच्या साथीने दिवाळी साजरी करण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्षांचे प्रयत्न सुरु आहेत.

 

एमआयएमने फटाके जमवायला सुरुवात केली असली तरी रिपाइं आणि मनसेला महापालिका निवडणुकीची दिवाळी जवळ आली याचा विसर पडला आहे. एकूणच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख पक्षांमध्ये विजयोत्सव साजरा करण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरु आहेत. मात्र, निवडणुकीसाठी उरलेल्या जेमतेम वर्षभराच्या वेळेच्या गणितामध्ये कार्यकर्त्यांची बेरीज, शहरातील प्रलंबित पक्षांची वजाबाकी करुन सर्वसामान्यांचा विश्वास जिंकू शकणाऱ्या पक्षालाच मतदारराजा विजयाची आतषबाजी करण्याची संधी देणार हे मात्र, कानठळ्या फोडणाऱ्या सुतळी बॉम्ब इतकेच सत्य !

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin