Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४४ - नगरसेवकांच्या भांडणात अशोक थिएटर प्रभागाचा विकास टांगला गेला खुंटीला


Main News

>> नगरसेवकांच्या इच्छाशक्ती अभावी डेअरी फार्म उड्डाणपुलाचा प्रश्न रखडला
>> पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील वाहतूक आणि पार्किंगच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ४४, अशोक थिएटरचे नेतृत्व करणाऱ्या दोन्ही नगरसेवकांच्यातील भांडणे आणि दोघांच्यातील समन्वयाअभावी प्रभागात चार वर्षांमध्ये कोणताच विकास झालेला नाही. विशेष म्हणजे नगरसेविका स्थायी समितीच्या सदस्य होत्या. आता नगरसेवकाला स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. तरीही प्रभागात कामेच झालेली नाहीत. डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणे प्रभागाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, हा प्रश्न सोडविण्यात नगरसेवकांची इच्छाशक्ती कमी पडली आहे. शहरातील सर्वांत मोठी बाजारपेठ प्रभागात असून, वाहतूककोंडी व पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांकडून कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व विद्यमान स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका सुनीता वाघेरे प्रभाग क्रमांक ४४, अशोक थिएटरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून अमर कापसे, पूनम कापसे आणि नेहूल कुदळे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. प्रभागात पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायत असताना पाइपलाइन टाकण्यात आली होती. डिलक्स चौकातील पाण्याच्या टाकीला जोडण्यासाठी एक नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. परंतु, अंतर्गत भागातील पाइपलाइन अद्यापही ग्रामपंचायत काळातीलच आहेत. प्रभागात पिंपरी कॅम्प ही शहरातील सर्वात मोठी व्यापारी पेठ आहे. येथील व्यापाऱ्यांनी व्यावसायिक नळजोड न घेता घरगुती नळजोड घेतलेले आहेत. त्यामुळे मीटरविना लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी महापालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडत असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात गेल्या दहा-बारा वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार सांडपाणी व्यवस्थेची क्षमता वाढविण्यात आलेली नाही. भूमीगत सांडपाणी व्यवस्था असून, त्याची नियमित साफसफाई केली जात नाही. प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेत येत नाहीत. व्यापाऱ्यांच्या दुकानात किंवा हॉटेलमधील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असूनही ती व्यवस्थित राबविली जात नाही. त्यामुळे प्रभागातील सर्वच कचराकुंड्या भरून वाहत असतात. अनेक व्यापारी नाल्यातच कचरा टाकून देतात. अशोक थिएटर, जयहिंद स्कूल, दुर्गामाता, तपोवन आणि शनी मंदिराजवळ कचऱ्याचा ढिग लागलेला असतो. तो वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने कचरा खाण्याची गायींची रांग लागलेली असते. अनेकदा कचरा खाऊन गायींचा मृत्यूही झाला आहे. परंतु, नगरसेवकांना त्याचे काहीही सोयरसुतक वाटत नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात विद्युत व्यवस्था भूमीगत आहे. नगरसेवकांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या परिसरात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. प्रभागात गेल्या चार वर्षांत केवळ पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचीच कामे झाली आहेत. जुने काढून पुन्हा तेच बसविले जातात. केवळ ठेकेदारांना पोसण्याचे आणि नगरसेवकांचा स्वतःचा विकास करुन घेण्याचा उद्योग सुरू आहे. प्रभागात एकही रस्ता विकास आराखड्यानुसार झालेला नाही. साई सफायर ते निमालय सोसायटीपर्यंतचा १२ मीटरचा रस्ता बिल्डरची एक इमारत आडवी येते म्हणून त्याठिकाणी अवघा नऊ मीटरचा करण्यात आला आहे. प्रभागातील रस्त्यांचे रुंदीकरण केल्यास व्यापारी पेठेत होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांची सुटका होऊ शकते, असे इच्छुकांनी सांगितले.

या प्रभागात बहुतांश सिंधी वसाहत आहे. येथे राहणाऱ्या सिंधी समाजाला सरकारकडून सनद दिली जाते. ही सनद न दिल्याने प्रभागात विकास आराखड्याची अंमलबजावणी होत नाही. विकास आराखड्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठीच सनद मिळ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यामागे आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत. प्रभागात अरूंद रस्ते आणि त्यातच व्यापारी निम्म्या रस्त्यावर अतिक्रमण करत असल्याने प्रभागाला कित्येक वर्षांपासून वाहतुकीचा फार मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जात नाही. प्रभागात आठ आरक्षणे आहेत. त्यापैकी दोन उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. उर्वरित आरक्षणे गायब आहेत. प्रभागाच्या विकासासाठी पुणे-मुंबई महामार्ग आणि पिंपरी कॅम्पला जोडणारा डेअरी फार्म येथे रेल्वेमार्गावर उड्डाणपूल होणे आवश्यक असल्याचे इच्छुक म्हणाले.

नगरसेवकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आणि नियोजन नसल्याने उड्डाणपूल उभारण्याचा केवळ गाजावाजा केला जात आहे. संरक्षण खात्याची जागा ताब्यात न घेताच उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. नागरिकांनी आंदोलने केल्यानंतर हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांमध्ये कोणताच समन्वय नाही. दोघांमध्ये वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. चार वर्षे भांडणातच गेल्याने प्रभागाचा विकास खुंटला आहे. दोघांनीही परिसर वाटून घेतला आहे. प्रभागात ना वाचनालय आहे, ना मैदान, ना जलतरण तलाव, ना स्पर्धा परीक्षा केंद्र. प्रभागाचे नगरसेवक केवळ मिरविण्यापुरतेच शिल्लक राहिले आहेत, अशी खंत इच्छुकांनी व्यक्त केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin