Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ६२ - फुगेवाडीत नगरसेविकाच्या पतीची दंडेलशाही; नगरसेवक प्रभागात फिरकतच नाहीत


Main News

>> बहुतांश आरक्षणांवर नगरसेविकेच्या पतीचा कब्जा
>> आरक्षणांच्या जागांचा अर्थार्जनासाठी वापर

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ६२, फुगेवाडीमध्ये नगरसेविकेच्या पतीची दंडेलशाही सुरू आहे. त्यांना विचारल्याशिवाय कोणतेच काम होऊ दिले जात नाही. नगरसेविकेच्या पतीने प्रभागातील बहुतांश आरक्षणांवर कब्जा करून पत्राशेड मारले आहेत आणि ते भाड्याने दिले आहेत. प्रभागात बेरोजगारीमुळे गुन्हेगारीही वाढली आहे. नगरसेविकेच्या पतीच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे दारू व मटक्याचे अड्डे सुरू आहेत. विकासाऐवजी खालच्या पातळीवरचे राजकारण केले जाते. नगरसेवक तर चार वर्षांत प्रभागात फिरकलेच नाहीत. प्रभागात कोणताही मोठा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मुलभूत सोयी सुविधांची कामेही व्यवस्थित झालेली नाहीत, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र काटे आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका संध्या गायकवाड हे प्रभाग क्रमांक ६२, फुगेवाडीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून प्रा. मनोज वाखारे, संभाजी फुगे, वैशाली वाखारे आणि नीलेश हाके हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. संपूर्ण प्रभागात कमी दाबाने पाणी येते. आझाद चौक, वाखारे कॉलनी, स्टार स्पोर्टस क्लब आणि नवरंग तरूण मंडळ परिसरात पाणीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. प्रभागात २० ते २५ वर्षांपूर्वीच्या पिण्याच्या पाइपलाइन आहेत. लोकसंख्या वाढूनही त्या बदलल्या जात नाहीत. पाण्यासाठी उपोषण व आंदोलने करूनही दखल घेतली जात नाही. प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये तर नागरिकांमध्ये पाण्यावरून नभांडणे होतात. पाणी साठवण्याच्या लहान टाक्या होत्या. त्याही नगरसेविकेच्या पतीच्या कार्यकर्त्यांनी फोडून टाकल्या आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

संपूर्ण प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. गेल्या चार वर्षांत सांडपाणी व्यवस्थेची कोणतीही कामे झालेली नाहीत. प्रभागातील आहे ती मोठ्या क्षमतेची पाईपलाइन काढून कमी क्षमतेची टाकण्यात आली आहे. केवळ टक्केवारीसाठी आता काही ठिकाणी सांडपाणी व्यवस्थेची कामे सुरू आहेत. तीही निकृष्ट दर्जाची होत आहेत. प्रभागातील बहुतांश सांडपाणी व्यवस्था घुशींनी पोखरलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. प्रभागातील सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला न जोडता नदीपात्रात सोडण्यात आले आहे. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर व नियमित येतात. परंतु, मुख्य रस्ता वगळता आतमध्ये जाण्यास रस्ताच नसल्यामुळे घंटागाड्या आत जाऊच शकत नाहीत. त्यामुळे नागरिक शौचालयाजवळ किंवा रेल्वेमार्गालगत कचरा टाकतात. तेथील कचरा कित्येक महिने उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते, असे इच्छुकांनी सांगितले.  

प्रभागाच्या बहुतांश भागात विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. विद्युत व्यवस्था भूमीगत आहे. परंतु, डीपी धोकादायक अवस्थेत आहेत. त्यांना झाकणे नसल्यामुळे अपघातही झाले आहेत. नगरसेविकेच्या पतीच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या परिसरातच एलईडी दिवे बसविले जात आहेत. प्रभागात शौचालय उभारण्यासाठीही नागरिकांना आंदोलने करावी लागली आहेत. प्रभागातील तीन शौचालयांपैकी एकही शौचालय चांगल्या अवस्थेत नाही. शौचालयांचे दरवाजे, कडी-कोयंडा व आतील भांडेही चोरीला गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना रेल्वेमार्गालगत शौचालयाला जावे लागते. रेल्वेची धडक लागून अनेकांचे प्राणही गेले आहेत. स्वच्छतेचे काम नगरसेविकेच्या पतीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्यामुळे ते साफसफाईच करत नाहीत. त्यामुळे त्यांना बोलायचे कोणी हा मोठा प्रश्न आहे. प्रभागातून जाणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गाचे काम सोडल्यास अंतर्गत रस्त्यांची बोंबाबोंब आहे. प्रभागातील एकाही रस्त्याचे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रूंदीकरण झालेले नाही. स्वतः नगरसेविकेचे पतीच रस्त्यांचे रूंदीकरण होऊ देत नाहीत, असे इच्छुकांनी सांगितले.

नगरसेविकेच्या पतीने शाळेच्या आरक्षणाच्या जागेत स्वतःसाठी इमारत बांधली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या जागेतून विकास आराखड्यातील रस्ता जातो. परंतु, नगरसेविकेचे पती हा रस्ता होऊ देत नाहीत. या जागेत खासगी कार्यक्रम व मटक्याचे अड्डे चालविले जातात. एवढेच नाही तर नगरसेविकेच्या पतीने उद्यानासाठी आरक्षित जागेवर पत्राशेड मारले आहे. ३० हजार रुपये अनामत रक्कम घेऊन ते भाड्याने दिले आहेत आणि त्यातून कमाई सुरू आहे. फुगेवाडी जकात नाक्याच्या जागेवर ताबा मिळवून तेही भाड्याने दिले आहे. भाजी मंडईची जागा संगनमताने भाड्याने देण्यात आली आहे. व्यायामशाळेच्या जागेचे दारू अड्ड्यात रूपांतर करण्यात आले आहे. सांस्कृतिक भवन केवळ नावाला आहे. नगरसेविकेच्या पतीच्या आशिर्वादामुळे महापालिकेच्या शाळेच्या कामाचे सिमेंट, भंगार व टेबलही चोरीला गेले आहेत. दवाखान्याचे जकात नाक्याच्या जागेत स्थलांतर करण्यात आले. ते प्रभागातील नागिरकांना माहितीच नाही. प्रभागात आरक्षणाच्या जागा असूनही त्याचा ताबा घेऊन विकास केला जात नाही, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागाचा विकास होण्याऐवजी केवळ नगरसेविकेच्या पतीचा विकास झाला आहे. त्यांच्या वरदहस्तामुळे आणि बेरोजगारीमुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक बेकायदेशीर धंदे सुरू आहेत. नगरसेविकेच्या पतीच्या दंडेलशाहीमुळे प्रभागात बिहारसारखी परिस्थिती आहे. महापालिकेची कार्यालये फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. नागरिक भितीच्या सावटाखाली जगत आहेत. महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी नगरसेवक कोणतेच प्रयत्न करत नाहीत. प्रभागाचा विकास करण्याऐवजी एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचे उद्योग सुरू आहेत. अगदी खालच्या पातशीवर जाऊन नगरसेविकेचे पती राजकारण करत आहेत. त्यामुळे प्रभागाचा विकास खुंटला आहे. नगरसेवक हे प्रभागात कधीच फिरकले नाहीत. नगरसेविकेच्या पतीची दंडेलशाही आणि नगरसेवक फिरकत नसल्यामुळे नागरिकांना शिफारस पत्र घेण्यासाठी शेजारच्या प्रभागातील नगरसेवकांच्या दारात जावे लागते. गेल्या चार वर्षांत प्रभागात कोणताच विकास झालेला नाही. केवळ नगरसेवकांचा विकास झाला आहे, असे इच्छुकांनी सांगितले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin