Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५९- अतिक्रमणामुळे मधुबन प्रभागातील रस्त्यांचा श्वास कोंडला; नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष


Main News

>> चार वर्षांत उद्यान व पाण्याची टाकी उभारण्याचे काम
>> प्रभागाच्या नगरसेविका चार वर्षांत नागरिकांना दिसल्याच नाहीत

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५९, मुधबनमध्ये गेल्या चार वर्षांत एक उद्यान आणि पाण्याच्या टाकीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. ही दोन कामे सोडल्यास मुलभूत सोयीसुविधा सक्षम करण्याकडे नगरसेवकांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. पाणी कमी दाबाने येते. कचरा वेळच्यावेळी उचलला जात नाही. रस्त्यांची साफसफाई होत नाही. प्रभागातील बहुतांश रस्त्यांवर हातगाडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चालणेही मुश्किल होते, तेथे वाहनांना जागा कधी मिळणार?, असा सवाल या प्रभागातील इच्छुकांनी केला. सर्वात महत्त्वाचे नदी स्वच्छतेचे नगरसेवकांना गांभीर्य नसल्याने नागरिकांना आरोग्य समस्या भेडसावत असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे व राष्ट्रवादीच्याच नगरसेविका सुषमा तनपुरे हे प्रभाग क्रमांक ५९, मधुबनचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून संतोष ढोरे, हिरेन सोनवणे, महेश भागवत हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. काही भागात पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम होऊनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे अनेक भागात स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. प्रभागात जादा क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असून, ते झाल्यास पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला.

प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. ते तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात. ही व्यवस्था जुनी असून, त्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे. पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रभागात स्वतंत्र व्यवस्था नाही. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. एक दिवसाआड किंवा दोन-दोन दिवस घंटागाड्या येत नसल्यामुळे नागरिक मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकतात. नृसिंह हायस्कूल व पेट्रोल पंपाजवळील जागा म्हणजे कचराकुंड्या बनल्या आहेत. शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथे कचरा टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागातील रस्त्यांचीही साफसफाई होत नाही. बहुतांश रस्त्यांचे विकास आराखड्यानुसार रूंदीकरण झालेले नाही. अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

रस्ते चांगले केले की सहा महिन्यांतच विविध कारणांसाठी खोदले जातात. त्यातच सर्वच रस्त्यांवर हातगाडीधारकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून पादचारी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहेत. वाहनचालकांना करसरत करतच वाट काढावी लागते. प्रभागात ७६ गाळ्यांची भाजी मंडई बांधून पडून आहे. तेथे कोणीच व्यवसाय करत नाहीत. सर्व व्यावसायिक रस्त्यावर अतिक्रमणे करून हातगाडी लावत आहेत. व्यवसायासाठी भाजी मंडईचा वापर करण्यासाठी सक्ती केली गेली पाहिजे. तसे झाले तरच रस्त्यावरील अतिक्रमणे काही प्रमाणात कमी होऊ शकतील. प्रभागात ४ ते ५ आरक्षणे आहेत. त्यापैकी केवळ उद्यानाचे आरक्षण विकसित करण्यात आले. ते काम चालू पंचवार्षिकमध्ये झाले आहे. उर्वरित आरक्षणांचा अद्याप ताबाही घेण्यात आलेला नाही, असे इच्छुक म्हणाले.

प्रभागात नदी स्वच्छतेचा प्रश्न सर्वात मोठा आहे. जलपर्णी वाढली असून, ते काढण्यासाठी नगरसेवकांकडून प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी औषध फवारणी किंवा धुरीकरण केले जात नाही. जलपर्णीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी आयुक्तांना मच्छरदाणी भेट देण्याचे आंदोलन करूनही महापालिकेला जाग आलेली नाही. प्रश्न “जैसे थे” आहे. महापालिकेच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी दोन्ही नगरसेवक कोणतेच प्रयत्न करत नाहीत. सामाजिक कार्यकर्तेच नागरिकांपर्यंत योजना पोचवत आहेत. प्रभागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. अंतर्गत भागात बस नाहीत. “मॉडेल वॉर्ड” बनविण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही कामे सुरू नाहीत. सांगवी ते बोपोडी पुलाचे काम मंजूर होऊनही कामाला सुरूवात नाही. जलतरण तलावाजवळ स्वच्छता राखली जात नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.

नवीन उद्यानात बसविण्यात आलेले खेळणी आठ दिवसातच तुटले आहेत. प्रभागात एकाही ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा किंवा सार्वजनिक सुविधा काहीच नाहीत. प्रभागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सोनसाखळी व किरकोळ चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षांत उद्यान आणि पाण्याची टाकी उभारणे ही दोन कामे वगळल्यास कोणतेही भरीव काम झालेले नाही. कामे करत असताना दोन्ही नगरसेवकांमध्ये कोणताही समन्वय नसतो. नगरसेविका गेल्या चार वर्षांत प्रभागात कधीच दिसलेल्या नाहीत. “नगरसेविका दाखवा आणि बक्षिस मिळवा”, अशी परिस्थिती आहे. दुसरे नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष होऊनही त्याचा फायदा प्रभागाच्या विकासासाठी झाला नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin