Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५८- नवी सांगवी प्रभागाचे दोन्ही नगरसेवक “नॉट रिचेबल”; चार वर्षांत विकासच नाही


Main News

>> नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात नगरसेवक ठरले अपयशी
>> नगरसेवक कार्यक्रमांनाही राहत नाहीत उपस्थित

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५८, नवी सांगवीमध्ये गेल्या चार वर्षांत कोणतेही भरीव काम झालेले नाही. आहे त्या मुलभूत सोयी सुविधा सक्षम करून त्या चांगल्या प्रकारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात नगरसेवकांना अपयश आले आहे. मूलभूत सोयी सुविधांबाबत नागरिकांना वारंवार तक्रारी कराव्या लागतात. त्यानंतरही तक्रारी सुटतील याची शाश्वती नसते. नगरसेवक स्थानिक नसल्यामुळे ते नागरिकांना कधी उपलब्ध होत नाहीत. नगरसेविका तर चार वर्षांत प्रभागात दिसलेल्याच नाहीत. नगरसेवक आणि नगरसेविका प्रभागातील कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित राहात नाहीत, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती नवनाथ जगताप आणि राष्ट्रवादीच्याच शैलजा शितोळे हे प्रभाग क्रमांक ५८, नवी सांगवीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून गौरव टण्णू, विनायक गारवे, संदिप दरेकर, श्रीनिवास बढे, शशी राजेगांवकर, पवन साळुंखे, ललित म्हसेकर, दिपक ढोरे आणि अमित निंबाळकर हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. चार वर्षांत प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या दोन पाइपलाइन टाकण्यात आल्या. परंतु, त्याच्यात पाणीच नसते. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही भागात टँकरने पाणी मागवावे लागते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जादा क्षमतेची सांडपाणी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, योग्य नियोजनाअभावी सांडपाणी तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात, असे इच्छुकांनी सांगितले.

सांडपाणी व्यवस्थेला बसविलेले चेंबर रस्त्यापेक्षा वर आले आहेत. सांडपाणी तुंबल्यास नागरिकांना स्वखर्चाने साफसफाई करून घ्यावी लागते. पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करूनही ती सांडपाणी व्यवस्थेला जोडण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. प्रभागातील संपूर्ण सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडण्यात आलेले नाही. काही सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या १५-१५ दिवस येत नाहीत. प्रभागाचे प्रवेशद्वार असलेल्या शनिमंदिराजवळच दोन कचराकुंड्या नेहमी भरून वाहत असतात. तेथील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नाही. नागरिक सीएमईच्या हद्दीत मोकळ्या जागेत कचरा टाकतात. त्यामुळे तेथे कचरा डेपो तयार झाले आहे. संपूर्ण प्रभागात एम. के. चौकात एकच स्वच्छतागृह आहे. त्याचीही साफसफाई केली जात नसल्याचे इच्छुक म्हणाले.

साई चौक ते पाण्याची टाकी, फेमस चौक ते साई चौक आणि वाघजाई मंदिर रस्ता अशा दोन-तीन रस्त्यांचेच विकास आराखड्यानुसार रुंदीकरण झालेले आहे. प्रभागातील उर्वरित सर्व रस्ते अरूंद आहेत. आता त्यांचे रूंदीकरण होणे अशक्य आहे. प्रभागातील सर्वच रस्त्यांना हातगाड्यांच्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. एका रस्त्यावर हातगाडीधारकांचे दोन-दोन, तीन-तीन रांग लागलेली असते. रस्त्यांना फूटपाथ हा प्रकारच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक रस्त्यांनी पायी फिरूच शकत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी किंवा अॅम्ब्युलन्स आतमध्ये जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. हातगाडीधारकांशी नागरिकांचा वाद झाल्यास ते आम्ही फुकट व्यवसाय करत नसल्याचे सांगतात. प्रभागात वाहतुकीचे कोणतेच नियम पाळण्यात आलेले नाहीत. प्रत्येक रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बसविण्यात आले आहेत. हाकेच्या अंतरावर असलेले पोलिसही वाहतूक नियमनासाठी काहीच करत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर अनेक अपघात होत आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात शाळा, खेळाचे मैदान, उद्यान यासाठी आरक्षणे आहेत. परंतु, त्याचा विकास झालेला नाही. भाजी मंडईच्या आरक्षित जागेत गाळे बांधूनही ते पोलिस ठाण्यासाठी भाड्याने देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजी व्यावसायिकांनी रस्त्यांवर अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रस्त्यांची कोंडी झाली आहे. प्रभागात एक बॅडमिंटन हॉल बांधण्यात आले आहे. परंतु, विनावापर पडून असल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीचीही दुरवस्था झाली आहे. खेळण्यासाठी पीडब्ल्यूडी मैदानाचा वापर करावा लागतो. ते बंद झाल्यास खेळण्यासाठी जायचे कोठे, हा प्रश्न आहे. नगरसेवकांना साधी व्यायामशाळाही उभारता आलेले नाही. प्रभागातील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न नगरसेवकांनी सोडविलेला नाही. प्रभागात भूमीगत विद्युत व्यवस्था तयार करूनही अद्याप डीपी काढता आलेले नाहीत. महापालिकेच्या विविध योजना गरजू नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. नागरिक स्वतःहून महापालिकेशी संपर्क साधून योजनांचा लाभ घेतात, असे इच्छुक म्हणाले.

नगरसेवक हे प्रभागाबाहेरचे आहेत. नगरसेविका चार वर्षांत प्रभागात कधीच दिसल्या नाहीत. नगरसेवक नागरिकांना कधी उपलब्धच होत नाहीत. त्यांना भेटायचे म्हटले तरी नागरिकांना भिती वाटते. ते फोनवर सुद्धा कधी उपलब्ध होत नाहीत.  कोणतेही काम करायचे म्हटले की नागरिकांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे जावे लागते. त्यानंतरच काही प्रमाणात समस्या सुटतात. दोन्ही नगरसेवक कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे प्रभागात गेल्या चार वर्षांत कोणताही भरीव विकास झालेला नाही. आहे त्या मुलभूत सोयी सुविधा सक्षम करून त्या चांगल्या पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देणे, एवढेच काम प्रभागात शिल्लक राहिले आहे. परंतु, तेही नगरसेवकांना करता आलेले नाही, असे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin