Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५६ - वैदुवस्ती प्रभागातील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा


Main News

>> प्रभागात आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे झाली विकासकामे
>> दोन्ही नगरसेवकांनी स्वतःच्या कामाचा कोणताही ठसा उमटविण्यात अपयश

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५६, वैदुवस्तीमध्ये प्रत्येक रस्त्याला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. नगरसेवकांमध्ये निष्क्रियता जाणवत असल्यामुळे प्रभागात मुलभूत सोयी सुविधा सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या चार वर्षांत प्रभागामध्ये कोणतेही मोठे काम झालेले नाही. दोन एकर जागेत उद्यान उभारण्याच्या कामाचे चार वर्षांपूर्वी भूमीपूजन झाले. प्रत्यक्षात या उद्यानाच्या सीमाभिंतीचेही काम नगरसेवकांना पूर्ण करता आलेले नाही. बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रभागात यापूर्वी जो काही विकास झाला आहे, तो आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे झाला. परंतु, नगरसेवकांनी स्वतःच्या कामाचा कोणताही ठसा उमटविलेला नाही, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रामदास बोकड व अपक्ष नगरसेविका वैशाली जवळकर हे प्रभाग क्रमांक ५६, वैदुवस्तीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून मुकेश पवार, तानाजी जवळकर आणि अरूण पवार हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टीमने संवाद साधला. प्रभागात पाणीपुरवठ्याचे नियोजन नाही. कमी दाबाने पाणी येते. काही भागात पहाटे तीन वाजता पाणी येते. सोसायट्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. प्रभागातील पिण्याच्या पाईपलाइन २० ते ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या कमी क्षमतेच्या असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या तीन टाक्या असूनही, नागरिकांना पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या चार वर्षांत पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी कोणतेही काम झाले नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात काही ठिकाणी भूमीगत, तर काही ठिकाणी खुली सांडपाणी व्यवस्था आहे. सांडपाणी तुंबण्याचे प्रकार नेहमीच घडतात. सांडपाणी व्यवस्था खाली आणि रस्ते वर झाले आहेत. चेंबर व झाकणे चोरीला गेले आहेत. त्यामुळे चेंबरमध्ये वाहने पडून अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये एकाचा जीवही गेला आहे. सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडले गेले आहे. पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात भयानक परिस्थिती निर्माण होते. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. स्वतः नगरसवेकावरच कचरा गोळा करून रस्त्यावर टाकण्याची वेळ आली होती. घंटागाड्या नागरिकांच्या घरासमोर थांबूनही कचरा नेत नाहीत. त्यामुळे नागरिक मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकून देतात. प्रभागातील कचराकुंड्या भरून वाहत असतात. वैदूवस्तीमध्ये चार गुंठे जागेत कचरा डेपो तयार झाला आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. तेथे साफसफाई होत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे इच्छुकांनी सांगितले.  

प्रभागाच्या संपूर्ण भागात विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. परंतु, नगरसेवकांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या भागातच एलईडी दिवे लावण्यास प्राधान्य दिले आहे. पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे कामही चेहरे पाहून केले जाते. एका ठिकाणचे पेव्हिंग ब्लॉक काढून प्रभागाच्या दुसऱ्या ठिकाणी बसविले जाते. काही तरी काम दाखवायचे म्हणून हे काम केले जाते. गेल्या चार वर्षात सुदर्शननगर गल्ली क्रमांक ३ मधील एकमेव रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. अन्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण होऊनही प्रत्येक रस्त्यावर हातगाडी व पथारीधारकांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य रस्ता ४० फुटांचा असून अतिक्रमणामुळे तो अवघा ३० फूट शिल्लक राहिला आहे. नागरिक संध्याकाळी पायी जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रभागातील नागरिकांना स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी हातगाडीधारकांशी वाद घालावा लागतो, असे इच्छुक म्हणाले.

दोन्ही नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर प्रभागात दोन एकर जागेत उद्यान उभारण्याच्या कामाचे नारळ फोडले. परंतु, चार वर्षांत सीमाभींतीचे कामही पूर्ण करता आलेले नाही. प्रभागातील व्यायामशाळेची दयनीय अवस्था झाली आहे. ही व्यायामशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वैदूवस्तीमध्ये महापालिकेची शाळा आहे. परंतु, मैदान नाही. मैदानासाठी आरक्षण असूनही त्याचा ताबा घेण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न केलेले नाहीत. वैदूवस्तीमध्ये स्वच्छतागृह असून, त्याची दैनंदिन साफसफाई केली जात नाही. प्रभागात कोठेच सार्वजनिक मुताऱ्यांची सोय नाही. विकासकामे करण्यासाठी दोन्ही नगरसेवकांमध्ये समन्वय दिसत नाही. दोघेही केवळ अंत्यविधी आणि लग्न समारंभांमध्येच दिसतात. नगरसेविकेऐवजी त्यांचे पतीच काम करतात. नगरसेवक जवळच्याच लोकांना महापालिकेच्या योजनांचा फायदा मिळवून देतात. प्रभागातील ७० टक्के नागरिक मागासवर्गीय आहेत. त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोचविण्यासाठी नगरसेवकांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे इच्छुकांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin