Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ५२ - ताथवडे-पुनावळेचे नगरसेवक केवळ सत्कार समारंभासाठी तत्पर


Main News

>> चार वर्षांत प्रभागामध्ये विकासकामांचा ठणठणाट
>> बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना सुविधा पुरविण्यास दिले जाते प्राधान्य

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ५२, ताथवडे-पुनावळेमध्ये गेल्या चार वर्षांत केवळ बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ताथवडे गावाचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर कोणताच विकास झालेला नाही. दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि महापालिकेत सत्ताही राष्ट्रवादीची तरीही गावाचा विकास आराखडा दोन वर्षे महापालिकेतच कुजविण्यात आला. बिल्डरधार्जिणा विकास आराखडा असून, शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला आहे. प्रभागात ना रस्ते चांगले केले आहेत, ना सांडपाणी व्यवस्था. कचराही उचलला जात नाही. महापालिकेच्या योजना म्हणजे काय हेच नगरसेवकांना माहिती नसल्याने नागरिकांना त्यांचा लाभच मिळत नाही. प्रभागाचे दोन्ही नगरसेवक म्हणजे समारंभांमध्ये केवळ नारळ घेणारे पाहुणे बनले आहेत. त्यामुळे नगरसेवकांना निवडून देऊन आम्ही चूक केली, अशी भावना या प्रभागातील इच्छुकांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेखर ओव्हाळ आणि राष्ट्रवादीच्याच यमुना पवार हे प्रभाग क्रमांक ५२, ताथवडे-पुनावळेचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून नवनाथ ढवळे, अजित पवार, राम गायकवाड, संतोष पवार, स्वप्नील नवले, चेतन पवार, अतुल रानवडे, राजेंद्र पवार, अतुल ढवळे, देवेंद्र पवार आणि अमर सोनवणे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागात कमी दाबाने पाणी येते. वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच अद्याप टाकलेली नाही. दोन वर्षापूर्वी पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे आमदार अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. प्रत्यक्षात अद्याप काम झालेले नाही. केवळ फोटोसेशन करण्यात आले. ग्रामपंचायत काळात टाकण्यात आलेल्या पाइपलाइनद्वारेच पाणीपुरवठा सुरू आहे. नव्याने झालेल्या सोसायट्यांमधील नागरिक टँकरने पाणी मागवून आपली तहान भागवत आहेत, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागात ग्रामपंचायत काळातच भूमीगत सांडपाणी व्यवस्था तयार करण्यात आली होती. ती आता जीर्ण झाली आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतर सांडपाणी व्यवस्था सक्षम करण्यात आलेली नाही. अनेक भागात अशी व्यवस्थाच अस्तित्वात नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर सांडपाणी सोडतात. प्रभागातील संपूर्ण सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आहे त्या व्यवस्थेची साफसफाई केली जात नाही. पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते. प्रभागातील नागरिकांनी कित्येक दिवस झाले घंटागाडीच बघितलेली नाही. नगरसेवक राहतात त्याच भागातील दैनंदिन कचरा उचलला जातो. नागरिक मोकळी जागा दिसेल, तिथे कचरा टाकत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. परंतु नगरसेवक शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करत नसल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मुख्य रस्ते वगळता अंतर्गत रस्तेच झालेले नाहीत. मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण झाले की, त्याच्या दुसऱ्याच दिवशी इतर कामांसाठी रस्ते खोदले जातात. केवळ टक्केवारीसाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम केले गेले आहे. बिल्डरांच्या गृहप्रकल्पांकडे जाणारे रस्ते मात्र तातडीने केले जातात. अंतर्गत रस्त्यांवर केवळ मुरूम टाकले जातात. ते पावसाळ्यात वाहून जाते. ताथवडे ते नवलेवस्ती रस्ता खड्डेमय बनला आहे. पवारवस्तीमध्ये पावसाळ्यात रस्त्यावरून जाऊच शकत नाही, अशी स्थिती बनते. प्रभागातून जाणाऱ्या सांगवी-किवळे बीआरटी रस्त्याला नागरिकांचा विरोध होता. परंतु तत्कालिन आयुक्तांनी मोबदला देण्याचे आश्वासन देऊन विनंती केल्यामुळे नागरिकांनी विरोध मागे घेतला. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला तरी नागरिकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. मोबदला मिळवून देण्यासाठी नगरसेवक काहीच पाठपुरावा करत नाहीत, अशी खंत इच्छुकांनी व्यक्त केली.

पुनावळेतील मुख्य रस्ते विकसित केले जात नाहीत. रस्ते झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या जमनींचा भाव वाढेल म्हणून बिल्डरांच्या दबावाखाली नगरसेवक व अधिकारी रस्ते करत नाहीत. प्रत्येक कामात नगरसेवक स्वतःचा स्वार्थ पाहत असल्याने प्रभागात विकासच झालेला नाही. अशोकनगर झोपडपट्टीत साधे स्वच्छतागृह उभारता आलेले नाही. त्यामुळे नागरिक उघड्यावर शौचाला जातात. पावसाळ्यात अशोकनगर झोपडपट्टीत पाणी शिरते. महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात नाहीत. प्रभागाच्या अंतर्गत भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. बीआरटी रस्त्याने बाधित झालेल्या कुटुंबियांना नगरसेवक झोपडपट्टीत जागा पकडा म्हणतात. जिल्हा परिषदेच्या शाळेच अद्याप महापालिकेत हस्तांतर झालेले नाही. प्रभागात उद्यान, रुग्णालय, विरंगुळा केंद्र, जलतरण तलाव किंवा इतर कोणतीच सार्वजनिक सुविधा नाही. एक दवाखाना असून, तेथे कोणत्याच सुविधा नाहीत, असे इच्छुकांनी सांगितले.

नगरसेविका व नगरसेवक केवळ समारसंभांमध्ये नारळ घेण्यापुरतेच उरले आहेत. पाणी, रस्ते, विद्युत, कचरा, सांडपाणी व्यवस्था या मुलभूत सुविधांची कोणतीच कामे प्रभागात झालेली नाहीत. दोन्ही नगरसेवकांनी परिसर वाटून घेतला आहे. त्यांच्यात कोणताच समन्वय नाही. त्यामुळे नागरिकांनी समस्या कोणाकडे मांडायचा हा मोठा प्रश्न आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतर ताथवडे गावासाठी मिळकतकर माफ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. नगरसेवकांनीही कर न भरण्यास सांगून नागरिकांची दिशाभूल सांगितले. आता घरांच्या किंमतीएवढे मिळकतकराची बिले आली आहेत. प्रभागात कोणत्यात सुविधा नसताना येथील नागरिकांनी कर का भरायचा?, असा सवाल इच्छुकांनी केला. ताथवडे गावाचा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा बनविण्यात आला. आराखड्यातील ७० टक्के आरक्षणे शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकण्यात आली आहेत. गावात ९९ एकर जागा गायरान आणि बिल्डरांच्या ५० ते १०० एकर जागा असूनही त्यावर एकही आरक्षण टाकण्यात आलेले नाही. एकाच शेतकऱ्याच्या जमिनीवर तीन-तीन आरक्षणे टाकण्यात आली आहेत.

प्रभागाचे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महापालिकेत सत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसचीच. तरीही ताथवडे गावाचा विकास आराखडा दोन वर्षे महापालिकेतच का कुजविण्यात आला?, असा सवाल इच्छुकांनी उपस्थित केला. विकास आराखडा बनविताना आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचा आरोपही इच्छुकांनी केला. एवढे होऊनही सरकार दरबारी आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. विकास आराखडा नसल्याने कामे होत नाहीत. नगरसेवक बिल्डरांची मर्जी सांभाळण्यात मग्न आहेत. महापालिकेच्या योजना नगरसेवकांनाच कळत नाहीत. त्यामुळे योजना नागरिकांपर्यंत पोहोचतच नाहीत. नगरसेवकांनी महापालिकेने कचरा अलगीकरणासाठी दिलेल्या डस्टबिन वाटण्यापलीकडे कोणतेच काम केलेले नाही. ग्रामपंचायतीने बांधलेल्या स्मशानभूमीची दुरूस्तीही नगरसेवकांना करता आलेली नाही. अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांना उन्हात थांबावे लागते, अशी परिस्थिती असल्याचे इच्छुकांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin