Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४९ - श्री साईमंदिर -श्री बापुजीबुवानगर प्रभाग उरला केवळ कर वसूल करण्यापुरता


Main News

>> विकासकामे पोहोचविण्यात नगरसेवक अपयशी
>> मुलभूत सोयी सुविधांचा प्रभागात ठणठणाट

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ४९, श्री साईमंदिर-श्री बापुजीबुवानगरला मुके नगरसेवक भेटले आहेत. नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन गेल्यानंतर नगरसेवक अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याशीच बोलण्याचा सल्ला देतात. प्रभागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. “माझ्या घरीच पाणी येत नाही, तर मी काय करू”, असे उत्तर नगरसेवकांकडून नागरिकांना मिळते. समस्यांनी ग्रस्त नागरिकांची बाजू घेण्याऐवजी नगरसेवक अधिकाऱ्यांचीच बाजू घेतात. त्यामुळे येथील समस्या “जैसे थे” आहेत. निष्क्रिय नगरसेवकांमुळे प्रभागात चार वर्षांत कोणताच विकास झालेला नाही. केवळ विविध कर गोळा करण्यासाठी प्रभागाचा वापर होत असल्याची खंत या प्रभागातील इच्छुकांनी व्यक्त केली.

शिवसेनेचे नगरसेवक संपत पवार आणि शिवसेनेच्याच नगरसेविका विमल जगताप हे प्रभाग क्रमांक ४९, श्री साईमंदिर-श्री बापुजीबुवानगर प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून नामदेव पवार, संदिप गाडे, तानाजी बारणे, गणेश भिगवणकर आणि संतोष बारणे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागाच्या मध्यभागी पाण्याच्या टाक्या आहेत. परंतु, प्रभागातच पाण्याची समस्या आहे. नागरिकांना वेळेवर पाणी कधीच मिळत नाही. आले तर कमी दाबाने येते. प्रभागातील सांडपाणी व्यवस्था कुचकामी असल्यामुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळून दूषित पाणी येते. कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यास नगरसेवक “माझ्याच घरी पाणी येत नाही, तर मी काय करू”?, असा नागरिकांनाच उलटा सवाल करतात. पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी पाइपलाइन जादा क्षमतेच्या टाकण्याची गरज असल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागाच्या काही भागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे, तर काही भागात कोणतीच सांडपाणी व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाणी उघड्यावर सोडले जाते. प्रभागातील सांडपाणी व्यवस्था १९९५ पूर्वीची असून, ती जीर्ण झाली आहे. ती चांगली करण्यासाठी चार वर्षांत कोणतेच काम झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात प्रभागाचे रुपांतर ओढे आणि नाल्यांमध्ये होते. पावसाळी पाण्याचा निचरा होणाऱ्या तयार केलली व्यवस्ता बुजविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी नागरिकांना स्वतःहून सांडपाणी व्यवस्था खोदून पाणी जाण्यासाठी वाट तयार करावी लागते. प्रभागाचे सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला न जोडता नदीपात्रात सोडून देण्यात आले आहे. प्रभागात महिला व पुरूषांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. नगरसेवकांना तेवढे पण काम करता आलेले नाही, असे इच्छुकांनी सांगितले.

प्रभागातील कचरा नियमित गोळा केला जात नाही. कधी कधी आठ ते दहा दिवस घंटागाड्या येत नाहीत. घंटागाड्यावरील कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात. अनेकदा नागरिकांना कचरा हातात घेऊन घंटागाडीमागे धावावे लागते. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या प्रभागातच भाजीमंडईसाठी आरक्षित मोकळ्या जागेत पार्क केल्या जातात. तरीही प्रभागात दैनंदिन कचरा गोळा केला जात नाही. गाड्या धुतल्या जात नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. प्रभागात कोठेच साफसफाई होत नाही. सफाई कर्मचारी दाखवा आणि बक्षिस मिळवा, अशी स्थिती आहे. नगरसेवकांनीच सफाईचे काम घेतलेले आहे. त्यामुळे बोलायचे कोणाला हा प्रश्न आहे. प्रभागात भूमीगत विद्युत व्यवस्था असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. परिसरातील वीज अनेकदा गायब होते. सुरळित विजपुरवठ्यासाठी नागरिकांना आंदोलने करावी लागली आहेत. डीपी जादा क्षमतेची करण्याची गरज आहे. त्यासाठी नगरसेवक पाठपुरावा करत नाहीत. विद्युत व्यवस्थेसाठी वापरण्यात आलेले वायर मुदतबाह्य झालेले आहेत. ते बदलण्याची आवश्यकता असल्याचे इच्छुक म्हणाले.

प्रभागात विकास आराखड्यानुसार एकही रस्ता विकसित करण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन मुख्य रस्ते वगळता प्रभागातील सर्वच रस्ते अरूंद आहेत. प्रभागाच्या आतमध्ये जायचे झाल्यास गाडी बाहेरच पार्क करून जावे लागते. रस्त्यांचे डांबरीकरण झाले की लगेच कोणत्या ना कोणत्या कामासाठी खोदले जाते. रस्त्यांवरील गतीरोधक धोकादायक बनले आहेत. गल्लीबोळात बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकचे सिमेंट आठ-दहा दिवसातच उखडले आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पेव्हिंग ब्लॉक खचले आहेत. प्राधिकरणाच्या हद्दीत येत असलेल्या या प्रभागात आरक्षणेच शिल्लक राहिलेली नाहीत. केवळ भाजीमंडईचे आरक्षण शिल्लक असून, ते महापालिकेच्या ताब्यात येऊनही त्याचा विकास झालेला नाही. इतर सर्व आरक्षणांवर नागरिकांची घरे झालेली आहेत. वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी प्रभागात आहे. परंतु, त्याचा प्रभागातील खेळाडूंना काहीच उपयोग होत नाही. अॅकॅडमीऐवजी मोकळे मैदानच बरे होते, अशी भावना इच्छुकांनी व्यक्त केली.

दोन-तीन प्रभागांसाठी मिळून प्रभाग क्रमांक ५० मध्ये स्मशानभूमी आहे. परंतु, तेथे पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथे साफसफाई होत नसल्याने स्मशानभूमीगत प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. प्रभागाच्या हद्दीवर सांगवी ते किवळे हा बीआरटीएस रस्ता असूनही वाहतूककोंडी ही नित्याचीच आहे. काळेवाडी फाटा येतील उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी सुटण्याऐवजी उलटे चित्र दिसत आहे. महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविल्या जात नाहीत. नगरसेवक ठराविक लोकांनाच योजनांचा लाभ मिळवून देतात. प्रभागात सुशिक्षित बेरोजगार असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राजकीय वरदहस्तामुळे दारू आणि मटक्याचे अड्डे सुरू आहेत. अंधार झाला की जागा दिसेल तेथे मद्यपी दारू पित बसलेले असतात. त्याचा महिला व मुलींना प्रचंड त्रास होत आहे. नागरिक भितीच्या सावटाखाली जगत आहेत. पोलिस प्रभागात फिरकतच नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. प्रभागात कोणत्याच सोयी सुविधा पोचविल्या जात नाहीत. केवळ कर वसूल करण्यासाठी प्रभागाचा वापर होत असल्याची खंत इच्छुकांनी व्यक्त केली.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin