Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४७ - काळेवाडी प्रभागाच्या नगरसेवकांकडून मतदान न केलेल्या “गल्ल्या टार्गेट”


Main News

>> भरीव काम तर दूरच मुलभूत सुविधा पुरविण्याकडेही नगरसेवकांचे दुर्लक्ष

>> कामे करण्याऐवजी नगरसेवकांची केवळ कार्यक्रमांना उपस्थित

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ४७, काळेवाडीमध्ये गेल्या चार वर्षांत नगरसेवकांनी कोणतेच भरीव काम केलेले नाही. आहे त्या मुलभूत सुविधा व्यवस्थित पुरविण्याकडेही नगरसेवकांनी लक्ष दिलेले नाही. पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा, आरक्षणे, रस्ते या सर्वच गरजांपासून प्रभाग वंचित आहे. नगरसवेकांनी जवळचे कार्यकर्ते आणि स्वतःला मतदान झालेल्या गल्ल्यांमध्येच थोडी फार कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित गल्ल्यांना “टार्गेट” करून विकासापासून वंचित ठेवले आहे. नगरसेवकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापलीकडे कोणतेही काम केलेले नाही. पैसे देऊन निवडून यायचे एवढेच नगरसेवकांच्या डोक्यात असल्यामुळे विकासकामांकडे दुर्लक्ष झाले आहे, असे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

काँग्रेसचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नीता पाडाळे हे प्रभाग क्रमांक ४७, काळेवाडीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या प्रभागातून संदिप सुर्वे, बालाजी पांचाळ, किरण नढे आणि नितीन बनसोडे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. संपूर्ण प्रभागात कमी दाबाने आणि दूषित पाणी येते. अनेक नागरिक जमिनीत खड्डे पाडून पाणी भरत आहेत. गेल्या चार वर्षांत पिण्याच्या पाण्याची जुनी पाइपलाइन बदलून नवीन टाकण्यात आली आहे. परंतु, त्याची क्षमता वाढविली गेली नाही. प्रभागातील गल्ल्यांमध्ये जुनीच पाइपलाइन आहे. त्यामुळे पाण्याची परिस्थिती “जैसे थे” राहिली आहे. अनेक सोसायट्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते, असे इच्छुकांनी सांगितले.

संपूर्ण प्रभागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही. गावठाण भागात अजूनही खुली गटारे आहेत. सांडपाणी व्यवस्थेचे नवीन काम झाले आहे. परंतु, ते निकृष्ट दर्जाचे आहे. प्रभागातील सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला न जोडता नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे नदीपात्र प्रदूषित झाले आहे. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या दररोज येत नाहीत. हॉटेल व्यावसायिकांचा मात्र दररोज कचरा उचलला जातो. प्रभागात कोठेच कचराकुंड्या नसल्याने नागरिकांच्यावर घरातच कचरा साठवून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण प्रभागात भूमीगत विद्युत व्यवस्था नाही. प्रभागात विद्युत खांब असून विज नसल्यामुळे स्ट्रीट लाइट बंद असतात. अनेकदा दिवसाही स्ट्रीट लाइट सुरू असतात, असे इच्छुक म्हणाले.

पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे अवघे २० टक्के काम झाले आहे. प्रभागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. रस्ते दर दोन तीन महिन्यांनी खोदले जातात. सांडपाणी व्यवस्थेचे चेंबर रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यातच रस्ते अरूंद आहेत. विकास आराखड्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. मुख्य रस्तादेखील विकास आराखड्यानुसार करता आलेला नाही. केवळ मार्किंग करून नागरिकांना नोटिस बजावण्यात आले आहेत. आता निवडणूक जवळ आल्यामुळे काही रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला सुरूवात झाली आहे. तेही आपले जवळचे कार्यकर्ते आणि मतदान झालेल्या गल्ल्यांमध्ये काम केले जात आहे. मतदान न झालेल्या गल्ल्यांना विकासांपासून वंचित ठेवले जाते. पार्किंगची कोणतीच व्यवस्था नसल्याने सर्वच रस्त्यांवर गाड्या लावलेल्या असतात. पार्किंग समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा केला नसल्याचे इच्छुक म्हणाले.  

प्रभागात खेळाचे मैदान, उद्यान, शाळा, दवाखाना आणि विरंगुळा केंद्र यासाठी आरक्षण आहे. परंतु, एकही आरक्षणाची जागा शिल्लक नाही. त्यावर नागरिकांची घरे झाली आहेत. महापालिकेची शाळा, दवाखाना, व्यायामशाळा आणि विरंगुळा केंद्र एकाच इमारतीत आहेत. याच इमारतीत सफाई कर्मचाऱ्यांना कार्यालयही देण्यात आले आहे. त्यामुळे शाळा म्हणजे कोंडवाडा झाला आहे. शाळेला मैदान नाही. प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन रस्त्यावर घ्यावा लागतो, अशी परिस्थिती आहे. शाळेला स्वच्छतागृह नाही. गेल्या २० वर्षांपासून हीच स्थिती आहे. दवाखान्यात डॉक्टरला बसण्यासाठी जागा नाही. रुग्णांना तपासणीसाठी उन्हात रांगेत उभे राहावे लागते. प्रभागात भाजीमंडई कोठेच नसल्याने विक्रेते रस्त्यावर बसून व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. प्रभागात चोऱ्या, गाड्या फोडणे व जाळणे तसेच मारामाऱ्यांचे प्रकार घडतात, असे इच्छुक म्हणाले.

पवना नदीच्याकडेने मोकळी जागा आहे. त्या खासगी वाटाघाटीने ताब्यात घेऊन तेथे एखादे उद्यान तयार करता येऊ शकते. परंतु, नगरसेवकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना सार्वजनिक प्रयोजनाची एकही सुविधा उपलब्ध नाही. नदीच्याकडेला सुरक्षाभिंत उभारण्याची आवश्यकता आहे. ते नसल्यामुळे अनेकांनी नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केल्या आहेत. परंतु, नगरसेवकांना सुरक्षाभिंत उभारावी, असे वाटत नाही. केवळ पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम त्यांना जमते. पेव्हिंग ब्लॉक सुद्धा बसविल्यानंतर दहा दिवसांतच उखडलेले असतात. नदीजवळ स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. परंतु तेथे सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. महपालिकेच्या योजना नगरसेवकांपेक्षा कार्यकर्तेच नागरिकांपर्यंत पोचवितात. नगरसेवकांनी निवडणुकीत केवळ आश्वासन देण्याचे काम केले. प्रत्यक्षात चार वर्षांत मतदान न केलेल्या गल्ल्यांना टार्गेट करण्यापलीकडे नगरसेवकांनी कोणतीच कामे केली नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin