Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


भोसरीत विलास लांडेंची राजकीय वाट बिकट; महेश लांडगे राजकारणात सुस्साट


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढत्या राजकीय ताकदीमुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचे मात्र राजकीय स्वप्नांना नवी उभारी येणार असल्याची राजकीय चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची राजकीय वाट बिकट बनली असून, विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अडीच वर्षानंतर देखील मोदी लाट कायम आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत लांडे यांची राजकीय नाकेबंदी होणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे. 

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजप धक्का देणार हे आता निश्चित झाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे ही त्रिमूर्ती एकत्र आल्यामुळे भाजपला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात आधीच राजकीय ताकद निर्माण केलेल्या भाजपला पानसरे यांच्या प्रवेश केल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातही “अच्छे दिन” आले आहेत. या मतदारसंघातील झोपडपट्टीबहुल भागात पानसरेंच्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेत हॅट्रटिक करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. 

भाजपच्या या वाढत्या ताकदीमुळे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांच्या राजकीय भवितव्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची पुढील राजकीय वाटचाल बिकट होणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्याने विलास लांडे यांची राजकीय नाचक्की झाली होती. त्यानंतर ते विजनवासात गेल्याने राजकीय महत्त्व कमी झाले. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा चर्चेत आले. मात्र बंडखोरी करूनही निवडणूक न लढविल्यामुळे त्यांचे जनमानसातील स्थान आणखी घसरले. आता त्यांची राजकीय वाटचाल ही महापालिका निवडणुकीवर अवलंबून आहे. 

मात्, लांडे यांच्यासाठी ही निवडणूक आता पूर्वीसारखी सोपी राहिली नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आमदार झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत घरातील किंवा नातेवाइकांनाच निवडून आणण्याची त्यांची राजकीय खेळी त्यांच्यावरच उलटली. निवडून आणल्यानंतर पदे सुद्धा घरातच ठेवण्याच्या त्यांच्या राजकीय डावपेचामुळे आमदारकीवर पाणी सोडण्याची वेळ त्यांच्यावर जनतेने आणली. आता ते पुन्हा आपल्या मुलासाठी आणि नातेवाइकांसाठी आग्रही आहेत. परंतु, अडीच वर्षानंतरही मोदी लाट कायम असल्यामुळे महापालिका निवडणुकीत भोसरी मतदारसंघात लांडे यांची डाळ शिजणार नाही, असेच सध्याचे राजकीय चित्र आहे. 

त्यातच आमदार महेश लांडगे यांच्यामुळे लांडे यांचे शहरातील राजकीय महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलासह किती समर्थक नगरसेवक निवडून आणतील, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. परिणामी महापालिका निवडणूक ही लांडे यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी असणार आहे. या निवडणुकीत लांडे यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांची संख्या वाढविली तरच त्यांचे राजकारणातील स्थान अबाधित राहणार आहे. अन्यथा त्यांना राजकीय विजनवासात जावे लागेल, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे त्यांचे कट्टर विरोधक आमदार महेश लांडगे यांनी काळाची पावले ओळखून भाजपमध्ये केलेला प्रवेश त्यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र आहे.  

आमदार लांडगे यांनी त्यांचे राजकीय गुरू आझम पानसरे यांनादेखील भाजपमध्ये आणल्यामुळे त्याचा त्यांना भविष्यात फायदाच होईल, असे बोलले जाते. भाजपची वाढलेली ताकद आणि आमदार लांडगे यांनी जनतेत निर्माण केलेली स्वतःविषयीची छबी यामुळे त्यांना चांगले राजकीय भवितव्य असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. महापालिका निवडणुकीत आमदार लांडगे हे आपल्या समर्थक नगरसेवकांची संख्या वाढवून माजी आमदार विलास लांडे यांची राजकीय नाकेबंदी करतील, असे सध्याचे राजकीय वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक लांडे आणि लांडगे या दोघांसाठीही प्रतिष्ठेची असणार आहे. त्यात लांडगे हे लांडे यांच्यावर मात करतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin