Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिका मुख्यालयाच्या शेजारील मोरवाडी प्रभाग विकासापासून वंचित


Main News

>> प्रभागातील तीन झोपडपट्ट्यांच्या विकासाकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष
>> संपूर्ण प्रभागात पाण्याचा प्रश्न गंभीर

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाचा समावेश होणाऱ्या प्रभाग क्रमांक २७, मोरवाडीमध्ये तीन मोठ्या झोपडपट्ट्यांचा समावेश होतो. या झोपडपट्ट्यांच्या आतमध्ये माणूस जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या चार वर्षात झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, तर दूरच किरकोळ विकासकामे देखील झालेली नाहीत. या झोपडपट्ट्यांच्या भागातील परिस्थिती अत्यंत भयानक बनली आहे. प्रभागातील चांगल्या भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. सोसायट्यांना दररोज हजारो रुपये खर्च करून पाण्याचे टँकर मागवावे लागतात. चार वर्षात कोणताही मोठा प्रकल्प राबविला गेला नसल्याचे या प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक २७, मोरवाडीमधून तुषार हिंगे, गोरख नवघणे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. मोरवाडी प्रभागात महापालिका मुख्यालयाची इमारत येते. त्यामुळे महापालिकेच्या शेजारीच असलेल्या या प्रभागात विकासाची गंगा वाहायला हवी होती. प्रत्यक्षात किरकोळ विकासकामेही झालेली नाहीत. या प्रभागातील चांगला आणि सुशिक्षित असलेल्या भागाला कमी दाबाने पाणी येते. आठवड्यातून दोन दिवस पाणीच येत नाही. त्यामुळे या भागातील सोसायट्या स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवितात. त्यावर हजारोंचा खर्च सोसायट्या करत आहेत. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नगरसेवकांकडून चार वर्षांत कोणतेच प्रयत्न झाले नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.

या प्रभागात लालटोपीनगर, इंदिरानगर आणि अण्णासाहेब मगर या तीन झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. या तीनही झोपडपट्ट्यांच्या भागातील अवस्था अत्यंत भयानक आहे. गेल्या तीन वर्षांत या भागात कोणताच विकास पोचलेला नाही. लालटोपीनगर झोपडपट्टी चढाच्या भागावर वसलेली असल्याने तेथे पाणीच पोचत नाही. त्यामुळे येथील महिलांना हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते. इतर झोपडपट्ट्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. तीनही झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालये असूनही त्यांचा काही उपयोग नाही. शौचालयांची साफसफाई केली जात नाही. नाले आणि खाणींच्या शेजारी वसलेल्या या झोपडपट्टयांमध्ये सांडपाणी व्यवस्था नाही. त्यामुळे उघड्यावर सांडपाणी सोडण्यात आल्याचे इच्छुकांनी सांगितले.

झोपडपट्ट्यांतील कचरा गोळा करण्यासाठी तीन-चार दिवसांतून एकदा घंटागाड्या येतात. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच कचरा ठेवतात किंवा कचराकुंड्या भरून वाहत असतात. ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात नाही. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात आरोग्याची कोणतीच काळजी घेतली गेली नसल्याने गोरगरीब झोपडीधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. झोपडीधारक भाडेकरूसारखे राहत आहेत. त्यांना कोणत्याच सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत. महापालिकेच्या अनेक योजना आहेत. त्या झोपडीधारकांपर्यंत पोचतच नाहीत. या प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकांनी झोपडीधारकांच्यापर्यंत विकास पोचविण्यासाठी चार वर्षात कोणते प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय असल्याचे इच्छुक म्हणाले.

संपूर्ण प्रभागात एकच उद्यान आहे. परंतु, त्याची निगा व्यवस्थित राखली जात नाही. उद्यानाचा वापर सर्वसामान्य करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. प्रभागात आरक्षणांची संख्या कमी आहे. जी आरक्षणे होती, त्यांच्या प्रयोजन वापरात बदल करण्यात आले. उद्यानाच्या शेजारी एक मोकळी जागा त्याठिकाणी मैदान होणे गरजेचे आहे. मोरवाडी प्रभागाच्या शेजारील दोन-तीन प्रभागात एकही मैदान नाही. या प्रभागांमध्ये कोणत्याही मोकळ्या जागा नाहीत. त्यामुळे मोरवाडी प्रभागात असलेल्या मोकळ्या जागेत मैदान झाल्यास इतर प्रभागातील खेळाडूंनाही त्याचा वापर करता येईल. त्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. इंदिरानगर झोपडपट्टी शेजारील ऑटो क्लस्टरजवळ भरपूर मोठी जागा अद्यापही मोकळी आहे. त्याठिकाणी एखादे आरक्षण विकसित करण्याची गरज असल्याचे इच्छुकांनी सांगितले.

मोरवाडी भागातील रस्ते रूंद आणि चांगले आहेत. परंतु, या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याची नितांत गरज आहे. या भागात गाड्यावरून जोरजोरात हॉर्न वाजवित फिरणाऱ्या तरूणांचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. झोपडपट्टी परिसरातील रस्त्यांकडे चार वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या भागात एकही रस्ता विकसित करण्यात आलेला नाही. चिंचवड पोलिस लाइन, एमआयडीसी कॉलनी आणि टेलिफोन कॉलनीत महापालिकेमार्फत कोणतीच विकासकामे केली जात नाहीत. या भागाचा विकास करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगून महापालिकेचे अधिकारी आपले हात झटकतात. त्यामुळे या भागात कोणतीच साफसफाई होत नाही. कचराही उचलला जात नाही. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. या भागाला कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नसल्याने झोपडपट्टीसारखी परिस्थिती बनल्याची खंत इच्छुकांनी व्यक्त केली. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin